पेण : प्रतिनिधी
तालुक्यातील नवघर येथील रेशनधान्य दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात मंगळवारी (दि. 17) ग्रामस्थांनी आपल्या लहान मुलांसह पेण प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या वेळी पुरवठा अधिकारी सुरेश थळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत योग्यती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
नवघर येथे महालक्ष्मी स्वयंसहाय्यता बचतगटाच्या नावाने रेशनिंग दुकान असून त्याच्या अध्यक्षा सुनीता गजानन कोळी आहेत. या दुकानातून गावातील ग्राहकांना अनियमित रेशन पुरवठा होत असून, वारंवार अपमानास्पद वागणूक मिळते. सरकारी प्रमाणानुसार धान्य न देणे याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, पेण तहसील कार्यालय पुरवठा शाखा आदी कार्यालयात वारंवार निवेदने दिली होती. त्यानंतर तहसील कार्यालयात दोनवेळा बोलावूनसुद्धा काहीच निर्णय झाला नाही व संबंधित दुकानावर कारवाई होत नसल्याने मंगळवारी नवघर ग्रामस्थांनी पेण प्रांत कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या वेळी वैभव कोळी, जनाबाई कोळी, संगिता मोहिते, पिंकी कोळी, नामदेव कोळी, अजय कोळी, सागर कोळी, धनाजी कोळी, विनायक कोळी, राजू कोळी, सुनीता कोळी, ज्योती कोळी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, पुरवठा अधिकारी सुरेश थळे यांनी उपोषणकर्त्याची भेट घेऊन रेशन दुकानांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार वरिष्ठ पातळीवर असल्याचे सांगितले.