Breaking News

खवल्या मांजराची तस्करी करणारे सात जण गजाआड

पाली/बेणसे ः प्रतिनिधी 

सुधागड तालुक्यात अंधश्रध्दा, काळी जादू व औषधासाठी दुर्मीळ वन्यजीवांची तस्करी करणार्‍या तस्करांचा सुळसुळाट झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी पाली वनविभागाने खवल्या मांजराची तस्करी करणार्‍या तस्करांस पकडले आहे. काही महिन्यांपूर्वी सुधागड तालुक्यात दुर्मीळ प्रजातीच्या व कोट्यवधी रुपयांच्या मांडूळाची तस्करी करणार्‍यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या, तसेच बिबट्याच्या नखांची तस्करी करणार्‍यांनादेखील वनविभागाने पकडून त्यांच्यावर सक्त कारवाई केली होती. त्यामुळे सुधागड तालुका दुर्मीळ वन्यजीव प्राणी व त्यांच्या अवशेषांची तस्करी करणारे केंद्र बनल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या प्रकरणी सात आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पाली दिवाणी न्यायालयाने त्यांना 9 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सहा. वनसंरक्षक अलिबाग, वनक्षेत्रपाल पेण, वनक्षेत्रपाल येऊर (स. गां. रा. उ. बोरिवली), वनक्षेत्रपाल सुधागड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पाली वाकण रोडवरील पिराचा माळ येथे मारुती सुझुकी वॅगनआर (एलएक्सआय गाडी क्र. एमएच 06 एएस 1751) तपासली असता वाहनातील सुनील माने याने गाडीची डिकी उघडून दाखवली असता डिकीत गोणपाटात झाकून ठेवलेले खवले मांजर आणि एक पिल्लू दिसून आले. जप्त केलेल्या मालमत्तेत अनुसूची 1मधील एक सस्तन प्राणी खवले मांजर व एक पिल्लू तसेच दोन लाख रुपयांची मारुती सुझुकी गाडी आणि 40,000 रुपयांच्या होंडा पॅशन गाडीचा समावेश आहे. या प्रकरणी वाहनातील आरोपी अशोक वाघमारे (27), शौकत मोमीन (44), सुनील माने यांच्यासह त्यांच्यासोबत असणारे चंद्रहास पाटील (49), नितीन पाटील (35), संदीप हिलम (39) आणि ज्ञानेश्वर पाटील (44) यांना पाली सुधागड येथे आणून त्यांच्याविरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972चे कलम 9, 39(3), 44 (1) (अ), 48 (अ), 49, 50, 51, 51 (अ)अन्वये मजरे जांभूळपाडा गु. नं. डब्लू एल 01- 2019-20, दि. 04-5-2019नुसार नोंद करून आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणातील सात आरोपींना पाली दिवाणी न्यायालयाने 9 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खवल्या मांजराची तस्करी करणार्‍यांना मोठ्या शिताफीने पकडून कारवाई केल्याने सुधागड वनक्षेत्रपाल समीर शिंदे व त्यांचे सहकारी वनपाल जी. बी. परहर, वनपाल महेंद्र दबडे व मजरे जांभूळपाडा वनविभाग कर्मचार्‍यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply