Breaking News

सार्वजनिक बांधकाम विभागाने बनविलेल्या वलप गणेशनगर रस्त्याची दुरवस्था; कामात अनियमितता; नागरिकांचा आरोप

कळंबोली : प्रतिनिधी

रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने काही दिवसांपूर्वी 70 लाख रुपये खर्चून बनवलेला वलप गणेशनगर रस्ता पावसाच्या सुरुवातीला वाहून गेल्याने वाहतुकीस आणि रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्याच्या कामात मोठी अनियमितता असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. दोन दिवसांत रस्ता बनविला गेला नाही तर ग्रामस्थ अधिकार्‍यांना घेराव घालण्याच्या विचारात आहेत.

जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा असलेला वलप गणेशनगर रस्ता हा गणेशनगर नागरिकांबरोबर गणेश भक्तांसाठी महत्त्वाचा रस्ता आहे. कारखाना मालक, कामगारांसाठी वेळ व पैसा वाचविणारा असल्याने सर्रास याच रस्त्याचा वापर होताना दिसून येतो. वलप गणेशनगरमध्ये विद्येची देवता गणरायाचे स्वयंभू मंदिर असल्याने संकष्टी चतुर्थीला रायगड, मुंबई, ठाणे येथून गणेशभक्त येत असून अलोट गर्दी होत असते. दर संकष्टीला तीन साडेतीन हजार गणेशभक्त भोजनाचा लाभ घेत आहेत. यावरून या रस्त्यावरून लोकांची मोठ्या संख्येने रहदारी चालू असते. या रस्त्यावर 15 ते 20 दिवसांपूर्वी खडी, माती टाकण्यात येवून मलमपट्टी लावण्याचा प्रकार केला होता. पावसाच्या सुरुवातीलाच हा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.

जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता दरवर्षी बनविण्यात येतो, पण पहिल्या पावसातच हा रस्ता वाहून जावून खड्डेमय होत आहे. भल्यामोठ्या पडत असलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होवून अनेकांना जखमी व्हावे लागले आहे. या खड्ड्यांबाबत वारंवार तक्रार करूनही हे खड्डे भरले जात नाहीत. वास्तविक जो कंत्राटदार रस्ता बनवतो त्याचीच खड्डे बुजवायची जबाबदारी असली पाहिजे. दरवर्षी बनविण्यात येणार्‍या या रस्त्याच्या कामात मोठी अनियमितता असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी करत दोन दिवसांत रस्ता बनविला गेला नाही तर वपलनगर ग्रामस्थ, गणेशभक्त, कारखाना मालक व कामगार अधिकार्‍यांना घेराव घालण्याच्या विचारात आहेत.

या रस्त्यासाठी आलेली रक्कम परत गेली आहे. तरी पण आम्ही ठेकेदाराला रस्त्यावर खडी आणि माती टाकण्यासाठी सांगितले आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे पनवेल येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील कुळकर्णी यांनी सांगितले. -वलप गणेशनगर रस्त्यावर नागरिकांना प्रवासात मरण यातना भोगाव्या लागत आहेत. प्रत्येक वर्षी वाहून जाणार्‍या या रस्त्याला कारणीभूत कोण? असा सवाल वलप परिसरातील जनतेबरोबर कारखाना मालक, कामगारांना पडला आहे. जे रस्त्याचे ठेके घेतात ते हलक्या प्रतीचे मटेरियल वापरतात. त्यामुळे रस्ता वाहून जात आहे. रस्ता नवीन बनविल्यानंतर पावसाच्या सुरुवातीलाच या रस्त्याची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थ, गणेशभक्तांना त्रास सहन करावा लागतो.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply