नागोठणे : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील निडी गावाच्या पुलाजवळ गुरुवारी (दि. 19) दुपारच्या दरम्यान स्कॉर्पिओ जीपने आयशर टेम्पोला पाठिमागून धडक दिली. या अपघातात टेम्पो चालकासह नऊ जण जखमी झाले. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
यग्नेश दिलीप पटेल हे आपल्या ताब्यातील स्कॉर्पिओ जिप (जीजे-01,एचडब्ल्यू-1811) घेऊन गुरुवारी मुंबई-गोवा महामार्गावरून गोवा बाजूकडे जात होते. नागोठणे जवळील निडीपुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे स्कार्पिओ जिपने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या आयशर टेम्पो (एमएच-06,बीडब्ल्यू-1414) आणि त्याच्या चालकाला धडक दिली. या अपघातात टेम्पो चालक राकेश लक्ष्मण पाटील (रा. ईरवाडी, ता. पेण) तसेच जिपमधील कार्तिक पंकजभाई पटेल (वय 28, रा. कोटेश्वर अहमदाबाद), मानसी कार्तिक पटेल (वय 26), फोराम यग्नेश पटेल (वय 34, रा. बोपाळ), जित यग्नेश पटेल (वय 1, रा. बोपाळ), शिवाय कार्तिक पटेल, (वय 5, रा कोटेश्वर), न्याशा कार्तिक पटेल (वय 4, रा.कोटेश्वर), यग्नेश दिलीपभाई पटेल (वय 33, रा. बोपाळ), धेय यग्नेश पटेल (वय 04, रा. बोपाळ) जखमी झाले. त्यांच्यावर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथोमोपचार करून पुढील उपचारासाठी मुंबईकडे पाठविण्यात आले. यातील कार्तिक पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक सचिन भोईर करीत आहेत.