पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याच्या उपमहापौर सिताताई पाटील यांच्या सूचना
पनवेल ः वार्ताहर
वारंवार पाठपुरावा केल्यामुळे शेवटी खांदा वसाहतीमध्ये गुरुवार पासून नालेसफाईला सुरुवात झाली. पनवेल महापालिकेकडून हे काम हाती घेण्यात आले. पाऊस सुरू होण्याच्या अगोदर युद्धपातळीवर सर्व नाल्यातील गाळ आणि माती काढून पावसाच्या पाण्याला वाट करून द्या, अशा सूचना उपमहापौर सिताताई पाटील यांनी केल्या.
नवीन पनवेल नोडचा पश्चिम भाग असलेल्या खांदा वसाहतीमध्ये जवळपास 25 किमी. लांबीचे पावसाळी नाले आहेत. 26 जुलै 2005 ला वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. दरम्यान त्यानंतर सिडकोकडून मान्सूनपूर्व नालेसफाई सुरू झाली, मात्र ज्या पद्धतीने साफसफाई होणे आवश्यक आहे. तशी न करता फक्त दाखवण्यासाठी हे सफाई करण्यात येत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. म्हणून उपमहापौर सिताताई पाटील यांनी सिडकोची नालेसफाई कशी फोल ठरली, हे अनेकदा ऐन पावसाळ्यात अधिकार्यांना बोलावून दाखवून दिले आहे. गेल्या वर्षीही पावसाळ्यात त्रेधातिरपीट उडाली असल्याने यंदा योग्य आणि चांगल्या पद्धतीने नालेसफाई करण्यात यावी, असा आग्रह उपमहापौर पाटील यांनी धरला.
पनवेल महापालिका या वर्षी सिडको हद्दीत मान्सूनपूर्व कामे करणार असल्याचे अगोदरच ठरले होते. या पार्श्वभूमीवर योग्य आणि पूर्णपणे त्याचबरोबर वेळेत नालेसफाई व्हावी यासाठी उपमहापौरांनी पुढाकार घेतला आहे, जेणेकरून पावसाळ्यात पाण्याचा पाण्याचा निचरा होऊन जनजीवन विस्कळीत होणार नाही अशाप्रकारचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. या आशयाचे पत्र त्यांनी आयुक्त गणेश देशमुख यांनासुद्धा दिले होते. त्याचबरोबर महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनासुद्धा पत्राची प्रत देण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाने दखल घेऊन गुरुवारपासून (दि. 19) खांदा वसाहतीत नालेसफाईला सुरुवात केली. नुकतेच उपमहापौर सीताताई पाटील यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक एकनाथ गायकवाड, अभिषेक भोपी यांनी प्रत्यक्ष जाऊन नालेसफाईची पाहणी केली.
नाल्यातील माती वेळेत उचलावी
सिडकोकडून होत असलेल्या नालेसफाईमध्ये आत मधून काढलेली माती बाजूला टाकण्यात येते आणि तीच माती पुन्हा नाल्यात जाते. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याला अडथळा निर्माण होतो. मागील गोष्टींचा धडा घेऊन महापालिकेने नालेसफाई केल्यानंतर त्वरित ही माती त्याचबरोबर कचरा उचलून टाकावा अशा सूचना उपमहापौर सिताताई पाटील यांनी या वेळी केल्या.