क्ले पेव्हर ब्लॉकविरोधात अश्वपाल संघटना आक्रमक
कर्जत : बातमीदार
माथेरानच्या रस्त्यावर बसविण्यात आलेले क्ले पेव्हर ब्लॉक काढण्यात यावेत, या मागणीसाठी अश्वपाल संघटनेने घोडे बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे सोमवारी (दि. 23) दिवसभर एकही घोडा रस्त्यावर आला नाही.
माथेरानमध्ये मोटारवाहनांना बंदी आहे. त्यामुळे येथील पर्यटनासाठी घोड्यांचा वापर होतो. मात्र माथेरानच्या रस्त्यावर बसविण्यात आलेल्या क्ले पेव्हर ब्लॉकवरून घोड्याचे पाय घसरून अपघात होत आहेत. त्यात अनेक घोड्यांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे माथेरान शहरातील रस्त्यांच्या चढ-उतारावर लावलेले पेव्हर ब्लॉक काढण्याची मागणी अश्वपाल संघटनेने लेखी निवेदनाद्वारे नगर परिषद प्रशासनाकडे वारंवार केली होती. मात्र प्रशासनाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर सोमवारपासून माथेरानमध्ये घोडे बंद आंदोलन सुरु झाले आहे. दरम्यान, आंदोलन सुरु झाल्यानंतर त्याची माहिती घेण्यासाठी आलेले एमएमआरडीएचे विजय पाटील यांनाही अश्वपाल संघटनेने मागणीचे निवेदन दिले.
माथेरानमध्ये पर्यटकांची सुविधा देण्यासाठी मंजुरी असलेली 450 घोडे आणि मालवाहतूक करणारे 400 घोडे यांनी सोमवारी घोडे बंद आंदोलनात सहभाग घेतला. स्थानिक अश्वपाल संघटनच्या अध्यक्षा आशाताई कदम आणि मूळ निवासी अश्वपाल संघटनेचे रामा आखाडे यांनी त्याबाबतचे निवेदन पोलिसांना दिले आहे.