उरण ः प्रतिनिधी
लॉकडाऊन निर्बंधांमध्ये शिथिलता आणि देशाच्या अर्थव्यवस्थेस गती आल्याने देशातील प्रमुख बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)मध्ये माल हाताळणीत वाढ झाली आहे. जेएनपीटीमध्ये जून 2020च्या 289,292 टीईयूच्या तुलनेत जून 2021 महिन्यात 441,984 टीईयूची माल हाताळणी झाली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 52.78 टक्के अधिक आहे. रेल्वे ऑपरेशनच्या बाबतीत जेएनपीटीमध्ये जून 2021मध्ये 548 रॅकद्वारे 88,849 टीईयू आयसीडी वाहतूक हाताळणी झाली व बंदराच्या कामगिरीत रेल्वेचा वाटा 20.10 टक्के झाला. वैद्यकीय उपकरणांची हाताळणी करून जेएनपीटीने कोविडच्या दुसर्या लाटेचा सामना करण्यातही महत्त्वाची भूमिका पार पाडली. मागील महिन्यात जेएनपीटीने एमव्ही ह्युंदाई जहाजातून आलेल्या एकूण 23.8 मेट्रिक टन वैद्यकीय उपकरणे असलेले दोन कंटेनर बंदरात उतरविले. जेएनपीटीच्या एपीएम टर्मिनलने एमव्ही ह्युंदाई हाँगकाँग या जहाजातून आलेली कोविड संबंधित औषधोपयोगी उपकरणे बंदरात उतरवली, तसेच एमव्ही मोल गारलँड या जहाजातील वैद्यकीय ऑक्सिजनचे दोन क्रायोजेनिक कंटेनर आणि एमव्ही ह्युंदाई प्लॅटिनम या जहाजातील वैद्यकीय उपकरणे असलेले चार कंटेनर बंदरात उतरविले. याव्यतिरिक्त एमव्ही सीएमए सीजीएम रिगोलेटो जहाजातून ही वैद्यकीय उपकरणे असलेले कंटेनर उतरविण्यात आले. जेएनपीटीच्या या कामगिरीबद्दल बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले की, आम्हाला अभिमान आहे की जेएनपीटीच्या कामगिरीत सुधारणा झाली असून कोरोनाच्या जागतिक साथीच्या काळातही बंदराची एकूण कंटेनर हाताळणी, कंटेनर वाहतूक आणि व्यवसायामध्ये वाढ होत आहे. आमचे प्रतिभावान आणि कुशल कामगार, सन्माननीय व मौल्यवान भागधारक यांनी यादरम्यान केलेले प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहेत. आम्हाला सदैव सहकार्य करणार्या आमच्या व्यापार भागीदारांनी वैद्यकीय ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय उपकरणांची निरंतरपणे हाताळणी व पुरवठा करून देशाच्या आर्थिक विकासामध्ये व कोविडविरुद्ध देशाच्या लढाईत एक प्रमुख योगदानकर्ता म्हणून जेएनपीटीचे स्थान कायम ठेवण्यात मदत केली आहे. जेएनपीटी अँटवर्प पोर्ट ट्रेनिंग अॅण्ड कन्सल्टन्सी फाऊंडेशनने उन्नत कौशल्ये व बंदर क्षेत्रातील सुरक्षा उपायांचे महत्त्व व वाढती मागणी लक्षात घेऊन धोकादायक वस्तू व सुरक्षा व्यवस्थापन विषयावर ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला. यामुळे जेएनपीटीला प्रगत जागतिक बंदरांच्या समतुल्य बनण्यास मदत होईल, असेही संजय सेठी यांनी नमूद केले आहे.