पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान सुमारे 32 कि.मी. अंतराचा फिटझगेराल्ड म्हणजेच सध्याचा सर्वशृत आंबेनळी घाट पोलादपूर तालुक्यातील कापडे खुर्द येथून सुरू झाला आहे.पूर्वी शिवकाळात महाबळेश्वरपर्यंत अथवा त्याहीपुढे जाण्यासाठी महाडच्या अग्नेय दिशेने माझेरी, वरंध, शिवथरघळ, पिंपळवाडी असा 24 कि.मी.चे सह्याद्री पर्वतराजीतून मार्गाक्रमण करून पोलादपूर तालुक्यातील किनेश्वर गावाजवळ पार घाट सुरू होत असे. या मार्गाला आजही शिवाजी रस्ता म्हटले जाते. त्याकाळी महाड ही तरत्या बंदराची उतारपेठ होती.
महाड तालुक्याला पोलादपूर पेटयाचा मुलूख 1948 सालापर्यंत जोडला होता. ब्रिटीशांनी पोलादपूरला महाल कचेरी ठेवली होती. स्वातंत्र्यानंतर 1958 साली पोलादपूर हा स्वतंत्र तालुका अस्तित्वात आला. पण तत्पूर्वी 1826 पर्यंत पार घाट हाच शिवकालीन मार्ग सातारा, वाई, कराडपर्यंत वाहतूकीसाठी वापरात येत होता. महाडच्या तरत्या बंदराच्या उतारपेठेतून मीठ, सुकी मासळी, नारळ, विडयाची पाने आदी सामानाची वाहतूक पार घाटामार्गेच वर्षानुवर्षे होत असे. मात्र, आजचे थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर शिवकाळात दंडकारण्यातील श्रीक्षेत्र महाबळेश्वर असे परिचित होते. पार घाटातून 1826 पूर्वी महाबळेश्वरला जाणारी पायवाट होती. येथून बंजारा लोक मीठ आणि धान्याची वाहतूक करीत. पारघाटातून येणार्या व जाणार्या मालावर घाटाच्या देखभालीसाठी जकात आकारली जात असे. आझ्याच्या बैलासाठी 1 रूका, धान्य,भूसा व मिठाच्या गोणीसाठी 3 रूके, तंबाखू व उडीद 6 रूके, कापड बंगी पाव रूका आणि कांबळे (ब्लँकेट) ओझे 9 रूके असे जकातीचे स्वरूप शिवकाळात होते.
पारघाटाला रडतोंडीचा घाट हा पर्यायी मार्ग होता. याखेरिज, भोर संस्थानापासून कामथे आणि ढवळे घाट वाटसरूंसाठी वापरात होते. मात्र, हा घाट दूर्गम व अवघड असल्याने येथून मालवाहतूक कठीण होती. सातारा, वाईशी कमी अंतरात पोहोचण्याचा हा मार्ग बिकट तर होताच पण या मार्गाची डागडुजी, देखभाल दुरूस्ती करण्यासाठी खुपच खर्च झाला. तरीही ब्रिटीशांना घोडागाडी अथवा मोटारगाडीसाठी उपयुक्त मार्ग तयार करण्याची आवश्यकता भासू लागल्याने पार घाटाच्या उत्तरेस 0.81 कि.मी. अंतरावर कापडे खुर्द गावाजवळ नव्याने घट बांधला. या घाटाला फिटझगेराल्ड म्हणत. हाच सध्याचा आंबेनळी घाट होय. या घाटाच्या उभारणीस 1871 साली सुरूवात होऊन केवळ 4 लक्ष 44 हजार रूपये खर्च झाला. हा घाट पाचच वर्षात वाहतुकीस खुला होऊन 1876 सालापासून ब्रिटीश आणि व्यापारी घोडयाला लगाम न लावता कापडे खुर्दपर्यंत उतरत असत. या घाट उभारणीच्या काळातच श्रीक्षेत्र महाबळेश्वरचा गिरिस्थान थंड हवेचे ठिकाण म्हणून ब्रिटीशांनी विकास केला.
शिवकाळात रायगडावरून निघाल्यावर समर्थ रामदासस्वामींचे दर्शन शिवथरघळीत घेतल्यानंतर पिंपळवाडी पासून महादेवाचा मुरा व तेथून सह्याद्रीच्या रांगांमधून थेट कांगोरीगडावर जात. शिवरायांनी हा गड हिंदवी स्वराज्यात आल्यावर त्याचे नांव मंगळगड ठेवले. तेथून पुढे ढवळागड म्हणजेच चंद्रगडावर विश्रांती आणि पारच्या देवीचे दर्शन. त्यावेळी पारला पार्वतीपूरही म्हणत असत आणि तिथे तुळजापूरची भवानीमाता हीदेखील रामवरदायिनीदेवी समवेत वास्तव्यास असे. छ. शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधानंतर या भवानीमातादेवीला खानाचा रूधिर टीळा लावल्याचा उल्लेख आहे. पुढे शिवरायांनी प्रतापगडावर म्हणजेच अफजलखानाच्या वधापूर्वीचा गुर्हागड येथे तुळजाभवानीची स्थापना केल्यानंतर देवळे येथील चित्रे कुटूंबाची रामवरदायिनी देवी कापडे बुद्रुक येथे पूजली जाऊ लागली. महिपतगड, कोंढवीगड, तानाजी मालुसरेंचे जन्मस्थान उमरठ गांव, सूर्याजी मालुसरेंची समाधी साखर ही शिवकालीन सृष्टी केवळ ब्रिटीशांनी फिटझगेराल्ड म्हणजे आंबेनळी घाट उभारल्यानंतर दृष्टीआड गेली आहे. त्यामुळे पोलादपूर ते महाबळेश्वरपर्यंत ऐतिहासिक व पर्यावरण पर्यटन क्षेत्र (इको टूअरीझम) घोषित करून या मार्गाचा सुनियोजित विकास केल्यास या भागाचे महत्व वाढेल. मात्र, या परिसरातच इको सेन्सेटीव्ह झोन निश्चित करण्यात येऊन काहीसा या घाटरस्त्याच्या विकासाला खीळ घालण्याचा प्रकार होऊ घातला असताना आता त्या शिफारसी स्थगित करण्यात आल्याने विकासाची संधी आजही आहे.
पोलादपूर येथे मुंबई ते पणजी राष्ट्रीय महामार्ग क्र.17 वर शिवछत्रपतींच्या पूर्णाकृती अश्वारूढपुतळयापासून मुंबईहून येणार्या प्रवासी व पर्यटकांना राष्ट्रीय महामार्ग कोकणात तर दुसरा राज्यमार्ग महाबळेश्वर, वाई, सातार्यापर्यंत घेऊन जातो. पोलादपूर या शहरातील ’शिवभारत’कार कवींद्र परमानंद यांच्या समाधीचे मठाचे दर्शन, पोलादपूरची ब्रिटीश जनरल क्रॉसवीसोबत मराठयाची शेवटची लढाई झाल्यानंतर त्या जनरल क्रॉसवीचे थडगे, यादवकाळात पोलस्तपूर असणारे ब्राह्मणकाळ व निझामशाहीत पोलादपूर नाव पडले. त्या पोलादजंग नावाच्या मुसलमान अधिकार्याची कबर, स्कॉटीश मिशनरीचे रेव्हरंड डोनाल्ड मिचेल यांचे थडगे, अलिकडेच बांधण्यात आलेले सदगुरू मंदीर आणि लेप्रसी मिशन हॉस्पीटल ही प्रेक्षणीय ठिकाणे पाहिल्यानंतर पैठण रस्त्यावरून आत प्रतिमहाबळेश्वर असलेले थंड हवेचे अविकसित ठिकाण कुडपण व कोंढवीगड, मोरगिरी व मोरसडे येथे पावसाळयात टेकडयांवर मोर फिरतात, ही पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. तेथून परत आल्यानंतर रानबाजिरे येथील धरणपरिसरात प्रसन्न वातावरणात पर्यटन विकास करण्यासाठी तरणतलाव, बोटींग क्लब, मासेमारी असे उपक्रम राबविता येतील. पावसाळयात पुढे खोपडचा मोरझोत धबधबा, घागरकोंडचा फेसाळणार्या नदीच्या पात्रावरील झुलता लोहरज्जूंचा पूल पाहण्यासाठी तरूणाईची तोबा गर्दी उसळते. तानाजी मालुसरेंचे जन्मस्थान उमरठ गांव, सूर्याजी मालुसरेंची समाधी साखर, मंगळगड ही शिवकालीन सृष्टी आवर्जून दाखविल्यास इतिहासप्रेमीही निश्चितच सुखावतात. पोलादपूर तालुक्यातील कापडे ते देवळे हा भाग स्विर्त्झलंडसारखा छोटया टेकडया व दर्यांचा असल्याने काही मुंबईकरांनी आपला पैसा गुंतवून निसर्ग सान्निध्यात टूमदार हवेल्याही बांधण्यास सुरूवात केली असून साप्ताहिक सुटी मिळताच हे मुंबईकर निसर्ग सान्निध्यात रममाण होण्यासाठी धाव घेतात.
कापडे बुद्रुक येथील रामवरदायिनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर आंबे, फणस, काजू, जांभळं, तोरणं, आळू, आसाणे असा फळे व रानमेव्याचा स्वाद घेत डोंगर झाडीतून वनभ्रमंती करण्यासाठी कुंभळवणे, पायटेवाडीपासून सुरूवात केल्यास घोडवती नदीच्या चिंचोळया उथळ पात्रातून पर्यटकांना आगळावेगळा आनंद मिळतो. तेथून पुढे दाभिळटोक भागात दर्यांत डोकाविताना आपण पक्षी होऊन विहंगम संचार करीत असल्याचा भास होतो. येथून काश्मीरी पहेलगामसारखे वाटीसदृश्य भागात वसलेले आदर्शगाव ढवळे इवलेसे दिसते.
आंबेनळी घाटात निसर्गसहवासाने तृप्त होताना तृषार्तही झाल्याची जाणीव होते. सध्या महाबळेश्वर गिरिस्थान थंड हवेचे ठिकाण पाहण्यासाठी जाणार्या पर्यटकांची तसेच सातारा, वाई, कराड, कोल्हापूरपर्यंत जाणार्या प्रवाशांची वाहतूक आंबेनळी घाटात मोठया प्रमाणात होते. हा संपूर्ण घाटरस्ता दूर्गम आणि त्याभोवतीच्या दर्या खूपच खोल असूनही या घाटात डोंगराच्या बाजूने रस्त्यावर कोसळणारे मातीचे दरडीचे ढिगारे दोन तीन वषे हलविले गेल्याने घाटरस्ता कसाबसा दुपदरी म्हणावा इतका अरूंद झाला आहे. रस्त्याच्या दुसर्या बाजूला संरक्षक कठडे नसल्याने वाहने कोसळून अनेकांचे जीवन संपुष्टात आले आहे. परिणामी, महाबळेश्वरला मुंबईचे पर्यटक आता मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावरून व त्यानंतर पुणे ते वाईमार्गे पसरणी घाटातून जाऊ लागले. मात्र, तो पसरणी घाट यापेक्षाही अधिक असुरक्षित असल्याचे गुजरात राज्यातील एक आरामगाडी उलटून अनेक कुटूंबे दगावल्याने स्पष्ट झाले. पोलादपूर ते महाबळेश्वर या मार्गावरही दरवर्षी अलिशान गाडयांचे अपघात झाले आहेत. त्यात प्रत्येकवेळी किमान पाच ते सात प्रवासी ठार झाले आहेत.अलिकडेच, येथे दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापिठाच्या बसला अपघात होऊन तब्बल 30 जण दगावले असल्याने भविष्यात तसा धोका निर्माण होणार नाही, यासाठी खबरदारी घ्यावी लागणार आहे.
22 जुलै 2021 रोजी रात्रभर अतिवृष्टी आणि भुस्खलनामुळे पोलादपूर तालुक्यातील कापडे खुर्दपासून वरील भागात म्हणजे ब्रिटीशकालीन फिटझगेराल्ड घाटाच्या सुरूवातीपासूनच दरडी कोसळून राज्यमार्ग दरीमध्ये वाहून गेला आणि ठिकठिकाणी वाहने घेऊन जाणे सुमारे महिनाभर तरी अशक्य झाले होते. मोटारसायकलस्वारांनी जीव मुठीत घेऊन पोलादपूरपर्यंत वाहने आणल्यानंतर थोडाफार शिल्लक असलेल्या घाटरस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्याची गरज निर्माण झाली. ज्याठिकाणी सातारा जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला शक्य नव्हते तिथे महाड विभाग आणि पोलादपूर उपविभागामार्फत घाटरस्ता दुरूस्त करण्यात आला. सद्यस्थितीत महाबळेश्वरपर्यतचा रस्ता काही ठिकाणी अरूंद तसेच काही प्रमाणात वाहतुकीस धोकादायक असूनही एस.टी.बसेस, जीप आणि अन्य वाहनांची वाहतूक सुरू आहे. मात्र, यंदाच्या पावसाळयामध्ये पुन्हा या घाटरस्त्याला धोका निर्माण होणार असल्याने या घाटरस्त्याचे रूंदीकरण करण्याची गरज आहे. केंद्रीय भुपृष्ठ वाहतुकमंत्री ना.नितीन गडकरी यांनी करंजाडी रेल्वे स्थानकापासून विन्हेरे काटेतळी पोलादपूरमार्गे महाबळेश्वरपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित करून आंबेनळी घाटाचे म्हणजेच फिटझगेराल्डचे रूंदीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे या मार्गावरून पर्यटन विकास तसेच ऐतिहासिक दर्शन साध्य होणार आहे.
राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री जयंतराव पाटील हे अनेकवेळा पोलादपूर ते महाबळेश्वर या आंबेनळी घाटमार्गाने मंबईकडे ये-जा करीत असल्याने त्यांनी या परिसराचा पर्यटन विकास करण्याचे वचन दिले होते. त्यांनी श्रीक्षेत्र हरिहरेश्वर व श्रीवर्धनचा पर्यटनविकास करून यापूर्वीचे वचन पाळले आहे. त्याकाळातील पर्यटन, वने आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवीशेठ पाटील हे रायगड जिल्ह्यातील असल्याने त्यांनी 20 मे 2005रोजी पनवेल पळस्पे ते पोलादपूर कशेडी घाटाचा नियोजित दौरा पोलादपूरपासून अर्ध्यावर सोडून महाड-पोलादपूरचे तत्कालीन आमदार माणिकराव जगताप यांच्या आग्रहावरून आंबेनळी घाटाचा दौरा केला असता त्यांनी हा घाटरस्ता सुरक्षित व रूंद करण्याचे आदेश दिले होते. एकंदरित, पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान सुमारे 32 कि.मी. अंतराचा फिटझगेराल्ड म्हणजेच सध्याचा सर्वशृत आंबेनळी घाट हा राजकीय इच्छाशक्ती प्रबळ झाल्यास नजिकच्या काळात ऐतिहासिक व पर्यावरण पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याचे स्वप्न साकारण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरू होतील, अशी अपेक्षा आहे.
-शैलेश पालकर, खबरबात