कर्जत प्रांत अधिकारी यांचे आश्वासन
कर्जत : बातमीदार
कर्जत, खालापूर तालुक्यात असलेल्या जुना राज्य मार्ग क्र. पस्तीस/अडतीस शहापूर मुरबाड, कर्जत हाळ, कर्जत व कल्याण नेरळ-कर्जत राज्य महामार्ग क्र. 548-अ साठी शेतकर्यांची जमीन भूसंपादित केली आहे. मात्र मोबदला मिळण्यासाठी तब्बल 12 वर्ष संघर्ष करीत असलेले शेतकरी कर्जत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला होते. शेतकर्यांच्या मागण्या करण्यात आल्याचे लेखी आश्वासन उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले.
खोपोली फाटा तसेच चौक-शहापूर मुरबाड कर्जत- हाळफाटा खोपोली तसेच चौक कर्जत व कल्याण नेरळ-कर्जत राज्य महामार्ग हा रस्ता शासनाकडून 2011-2012 यावर्षी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानी चौपदरीकरण व सुधारणा करण्यासाठी घेतला. मात्र मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानी भूसंपादित झालेला शेतजमीनीचा मोबदला शेतकर्यांना दिला नाही. तरी सुद्धा शेतकर्यांनी सदरील रस्त्याच्या चौपदरीकरण व सुधारणा करण्यासाठी सहकार्य दाखवले त्यामुळे या रस्त्याचे काम 80 टक्के पुर्ण झाले आहे. तसेच हा रस्ता शासनाने राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 अ घोषित करून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गाकडे वर्ग करण्यात आले.
शेतकर्यांची परवानगी न घेता किंवा शासन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ बैठक न घेता पोलीस बळाचा वापर करून रस्त्याचे काम करीत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने योग्य त्या सूचना देण्यात याव्यात व भूसंपादित शेतजमिनीचा शेतकर्यांस योग्य तो मोबदला अदा करावेत. मात्र त्याप्रमाणे शासनानी काहीच सकारात्मक भूमिका न दर्शविल्याने अखेर शेतकर्यांनी कर्जत येथील प्रांत कार्यालयात उपोषणाला बसले असता तर प्रांताधिकारी अजित नैराळे यांनी सर्व शेतकर्यांना कार्यालयात बोलावून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसेच राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अधिकारी वर्गाशी बोलून सर्व मुद्द्यांवर सकारात्मक कार्यवाही सुरू असल्याचे आश्वासन पत्र येऊन उपोषण कर्त्यांना देण्यात आले.