उरण ः प्रतिनिधी
कोरोनाने देशात व राज्यात हाहाकार माजविला आहे. उरणमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उरणमध्ये असलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने रुग्णांचा आकडा वाढत आहे. या समस्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उरणमधील पत्रकारांनी ई-मेलद्वारे पाठविले आहे. याची माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना देण्यात आली आहे. उरण तालुक्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेने हाहाकार माजविला आहे. उरणमध्ये दररोजचा आकडा आता 70 रुग्णांच्या पुढे जाऊ लागला आहे. शासनाने या ठिकाणी निर्माण केलेल्या कोविड केअर रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांवर तातडीने उपचार होण्यासाठी डॉक्टर्सची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे उरणच्या रुग्णांना स्थानिक ठिकाणी उपचार मिळणे दुरापास्त होत आहे. रुग्णसंख्या 80च्या घरात असताना केवळ चार डॉक्टर्स आहेत. त्या ठिकाणी परिचारिकांची तसेच वॉर्डबॉयची संख्याही कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी रुग्णांची हेळसांड होताना दिसत आहे. या सर्व बाबी पाहता भविष्यात या ठिकाणी कोरोनाचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढत्या रुग्णसंख्येला उरण तालुक्यातच उपचार मिळणे आवश्यक आहे. रिपोर्ट लवकर मिळणे गरजेचे आहे. रिपोर्ट टेस्ट झाल्यानंतर तीन-चार दिवस उशिरा येत असल्याने पॉझिटिव्ह रुग्ण बाजारात आणि परिसरात फिरत असल्याने अधिक धोका संभवतो. उरण तालुक्यातील रुग्णांसाठी व्हेंटिलेटरची सुविधा मिळणे आवश्यक आहे. किमान 10 व्हेंटिलेटरची सुविधा ही तज्ज्ञांसह असणे आवश्यक आहे. रुग्णांसाठी अॅम्ब्युलन्स सुविधाही लवकरात लवकर मिळावी. स्थानिक प्रशासनाने तालुक्यातील कोरोनासंदर्भातील माहिती पत्रकारांना द्यावी, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.