भाजपचे रोहा तहसीलदारांना निवेदन
धाटाव : प्रतिनिधी
राज्य सरकारने इंधानावरील कर आणखी कमी करावा, या मागणीचे निवेदन गुरुवारी (दि. 26) रोहा भाजपच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. तर रोहा शहरातील राम मारुती चौकात महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढले आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करून जनतेला दिलासा दिला आहे. राज्य सरकारनेही इंधानावरील कर आणखी कमी करावा, असे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, रोहा भाजप तर्फे शहरातील राम मारुती चौकात महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. इंधनावर जास्त कर आकारण्यात महाराष्ट्र राज्य सरकारचा देशात पहिला नंबर लागतो.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने येत्या तीन दिवसांत इंधनावरील कर कमी केला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, इशारा भाजप युवा मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांनी या वेळी दिला.
युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस नरेश कोकरे, रोहा तालुका अध्यक्ष राजेश डाके, कामगार आघाडीचे तालुका अध्यक्ष विलास डाके, सरचिटणीस दीपक भगत, शहर अध्यक्ष निलेश धुमाळ, धाटाव विभाग अध्यक्ष कृष्णा बामणे, सोशल मीडिया संयोजक सनिल इंगावले, अमर वारंगे, अनिल खंडागळे, विशाल टेंबे, शिवाजी जाधव यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.