कर्जत : प्रतिनिधी
ग्रामदैवत श्री धापया महाराज यांचा उत्सव अक्षय तृतिये (दि. 7) पासून सुरू होत असून, त्या निमित्ताने बुधवारी (दि. 8) शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेला कुस्तीचा आखाडा रंगणार आहे.
कर्जतचे ग्रामदैवत श्री धापया महाराजांचा उत्सव अक्षय तृतियेला सुरू होतो. सकाळपासून धार्मिक कार्यक्रम होतात. सायंकाळी शहरातून धापया महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात येते. घरोघरी आरती करून पालखीचे दर्शन घेण्यात येते. दिवसभर सर्वधर्मिय भाविक धापया महाराजांचे दर्शन घेवून आपली गार्हाणी मांडतात. रात्री भजन व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
दुसर्या दिवशी सकाळपासून श्री धापया महाराज मंदिराच्या प्रांगणात कुस्त्यांना सुरुवात होते. लहान मल्लांच्या कुस्त्या सकाळी रंगतात तर दुपार नंतर मोठ्या मल्लांच्या कुस्त्यांना सुरुवात होते. या आखाड्यात अनेक नामवंत कुस्तीगिर उपस्थिती दर्शवितात. मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर आदी भागातील मल्ल येथे येतात. या कुस्ती आखाड्याला शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा आहे.