Breaking News

‘आचारसंहितेचे कारण सांगून दुष्काळ निवारणाची कामे अडवू नका’

मुंबई ः प्रतिनिधी

दुष्काळी भागातील पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, टँकर मंजुरी, चारा छावण्या सुरू करणे, रोहयोमधील कामे यांना आचारसंहितेची कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने आचारसंहितेचे कारण सांगून कोणतेही प्रस्ताव थांबवू नयेत. प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन कामे सुरू करावीत, असे

निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले. उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनांसंदर्भात तक्रारी अथवा सूचनांची प्रशासनामार्फत तातडीने दखल घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकताच ‘वर्षा’ निवासस्थान येथून ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकार्‍यांशी संवाद साधला. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील अनेक ग्रामस्थांनी टँकर पुरवठा, चारा छावणी, रोहयोची कामे आदींसंदर्भातील स्थानिक तक्रारी थेट मुख्यमंत्र्यांना सांगितल्या. या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकार्‍यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सरपंचांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासनाने उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळाची नोंद घेऊन तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी योग्यरीतीने होते की नाही, त्यामध्ये काही सुधारणा आवश्यक आहेत का, यासंबंधी माहिती घेण्यासाठी सरपंचांशी संवाद साधला जात आहे. ऑडिओ संवादाद्वारे आलेल्या तक्रारींची नोंद प्रशासनाने घेतली असून, त्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे, तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या तक्रारींचे शिघ्रगतीने निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply