हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी पावसाचे नेहमीच्या वेळापत्रकाच्या तुलनेत तीन दिवस आधीच, 29 मे रोजी केरळमध्ये आगमन झाले आहे. अतितीव्र उष्म्याचा या वर्षी हिवाळी गव्हाच्या पिकावर प्रतिकूल परिणाम झालेला दिसला. इतका की सरकारला गव्हाची निर्यात रोखावी लागली. आता मान्सूनचे आगमन वेळेआधी झाल्यामुळे देशात भात व तेलबियांचे पीक जोमाने येईल, अशी आशा निर्माण झाली आहे.
अरबी समुद्र आणि केरळमधील हवामानाच्या परिस्थितीवरून हवामानशास्त्र विभागाने रविवारी मोसमी पाऊस अर्थात मान्सून देशात दाखल झाल्याचे जाहीर केले. वेळेआधी झालेले मान्सूनचे हे आगमन मुंबईत साधारण10 जूनपर्यंत मोसमी पाऊस दाखल होईल असे सूचित करते. राज्याच्या दक्षिण भागामध्ये त्याही बराच आधी मोसमी पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. यावेळी 27 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे असे यापूर्वी हवामान विभागाने जाहीर केले होते, परंतु चार दिवस पुढे-मागे होऊ शकतील असेही तेव्हाच सांगितले होते. यंदा मोसमी पाऊस 16 मे रोजी अंदमानात प्रवेश करता झाला. हे आगमन नेहमीपेक्षा तब्बल सहा दिवस आधी होते, परंतु अंदमानहून पुढे सरकल्यानंतर काही काळ मान्सूनचा वेग मंदावल्याने अरबी समुद्रातील त्याची प्रगती रखडली. अखेर 20 मे रोजी दक्षिण अरबी समुद्रात त्याचा प्रवेश झाला आणि अनुकूल वातावरण निर्माण झाल्यानंतर रविवारी 29 मे रोजी मोसमी पावसाचे ढग केरळमध्ये दाखल झाले. मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होणे ही अवघ्या देशासाठी आनंदवार्ता मानली जाते कारण तिथूनच त्याचा जून ते सप्टेंबर असा चार महिन्यांचा काळ चालणारा देशव्यापी प्रवास सुरू होतो. भारतात होणार्या एकूण पर्जन्यमानाच्या 70 टक्के पाऊस हा नैऋत्य मोसमी पावसामुळे होत असल्यामुळे तो अनेक घटकांवर परिणाम करतो. त्यामुळेच त्याची केरळमधील प्रवेशाची तारीख ही निव्वळ हवामानशास्त्रीय कारणांकरिताच नव्हे तर देशाच्या आर्थिक कॅलेंडरमधीलही एक महत्त्वाची तारीख गणली जाते. ही तारीख घोषित करण्यासाठी 2016 साली विशिष्ट निकष निश्चित करण्यात आले. विशिष्ट भौगोलिक परिसरातील पाऊस, त्याची तीव्रता, वार्याचा वेग आदी बाबी याकरिता विचारात घेतल्या जातात. सर्वसाधारणपणे 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो, परंतु यापूर्वीच्या काही वर्षांवर नजर टाकली असता सर्वसाधारणपणे 29 मे ते 1 जून या काळात मान्सूनचे आगमन झालेले दिसते तर 2019 साली मात्र मोसमी पाऊस 8 जूनला देशात दाखल झाला होता. मान्सूनच्या आगमनाच्या तारखेचा बराच गाजावाजा होत असला तरी संपूर्ण देशात त्यानंतर होणारे पर्जन्यमान, त्याचे प्रमाण, निरनिराळ्या राज्यांमध्ये तो किती प्रमाणात पडणार यापैकी कशावरही या तारखेचा काहीही परिणाम होत नाही. कधी पावसाचे आगमन वेळेआधी झालेले असताना सरतेशेवटी एकूण पाऊस मात्र सरासरीपेक्षा कमी झाल्याचेही पहायला मिळते. हवामान विभागाने यंदाच्या वर्षी सर्वसाधारण पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या देशात आजही लाखो शेतकर्यांचे जीवन पूर्णपणे मोसमी पावसावर अवलंबून असते. सुमारे 60 टक्के लोकांचे शेती हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन असून देशाची 18 टक्के अर्थव्यवस्था आजही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळेच मान्सूनचे आगमन वेळेआधी झाले ही अवघ्या देशासाठीच एक मोठी आनंदवार्ता आहे.