Thursday , March 23 2023
Breaking News

आक्रमणाची संयमित राजनीती!

26 फेब्रुवारीला भारतीय वायुसेनेची विमाने पाकिस्तानातील बालाकोटा भागातील अरण्यात घुसली आणि जैश-ए-मोहम्मद ह्या आतंकवादी संघटनेचे सुसज्ज तळ पार उद्ध्वस्त करून 20 मिनिटात आपल्या ठिकाणी परतली. पाकिस्तानला धडा शिकवायला सुरुवात झाली. ह्या एका घटनेपासून भारतातील सामान्य माणूस आणि राजकीय नेते ह्यांनाही शिकण्यासारखे पुष्कळ आहे. देशातील वातावरण आनंदाचे, उत्साहाचे आणि काहीतरी दुष्प्राप्य मिळविल्याचे समाधान देणारे आहे. ह्याचसाठी आपण जगत होतो असे वाटायला लावणारे आहे. पुरुषार्थाचे आणि विजिगीषुत्वाचे दिवस बघायला मिळाले म्हणून आबालवृद्ध समाधानी आहेत. युद्धमानतेचा काळ आपण अनुभवतो आहोत. आपण मनाने सैनिक झालो आहोत. सैनिकाला देशापेक्षा मोठे काही नसते. तो देशासाठी जगत असतो आणि देशासाठी प्राणार्पण करायला सदैव सज्ज असतो. त्याला शत्रू कोण ते माहीत असते. कमीतकमी वेळात आणि कमीतकमी साधनांनिशी त्याला शत्रूला धूळ चारायची असते. त्याला जिंकायचेच असते. त्याच्या आचारात आणि विचारात देशाचा सन्मान सामावलेला असतो. म्हणून आपले लक्ष्य गाठण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तो सदैव सिद्ध असतो. एव्हढा एक गुण आपल्याला सैनिकांकडून घेता येईल. अज्ञान आणि निष्क्रियता ह्यात आनंद मानणे हा आपला ठेविले अनंते तैसेचि राहावे धाटणीचा स्वभाव आपला शत्रू आहे असे आपण मानले, तर लवकरात लवकर त्याला दूर करण्यापलीकडे आपणाला व्यवधान असणार नाही. आपण बदलू आणि त्यामुळे जगही बदलू शकेल. आपल्याला गणवेशविरहित सैनिक बनायचे आहे.

त्यासाठी पाळावयाचा अगदी सोपा नियम म्हणजे जे भारतासाठी प्राणार्पण करतात त्यांना शहीद न म्हणता हुतात्मा म्हणावयाचे आहे. जो इस्लामच्या उद्दिष्टांसाठी प्राणार्पण करतो त्याला शहीद म्हणतात. बालाकोटवरील हल्ला हा आंतरराष्ट्रीय संकेतांच्या चौकटीत पूर्णपणे नियमानुसार केलेला हल्ला आहे. पाकिस्तानात घुसून आपण मारले आहे, पण तसे करताना सीमोल्लंघनाचा, असलाच तर तो दोष आपणाला लागणार नाही ह्याची काळजी घेतली आहे. बालाकोटची कारवाई युद्धाच्या प्रचलित परिभाषेत प्रतिबंधात्मक असैनिकी कारवाई मानली जाते. सैनिकच लढताहेत पण त्याची माहिती जगाला संरक्षण मंत्री नव्हे, तर विदेश व्यवहार मंत्री आणि त्या मंत्रालयाचे सचिव देत आहेत. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था सहन होत नाही, पण सांगताही येत नाही अशी झाली आहे. चीनला पाकिस्तानचे समर्थन करता येत नाही आणि भारताचा निषेध करता येत नाही. अन्य देशांना भारताच्या समवेत राहणे भाग पडत आहे. भारताने केवळ पाकिस्तानातील आतंकवादी अड्डे नेस्तनाबूद केले आहेत. पाकिस्तानी शासनाच्या आस्थापनांवर आणि लोकवस्तीवर हल्ले केलेले नाहीत, पण आपण करू शकतो हा संदेश गेला आहे. अर्जुनाला जसा माशाचा केवळ डोळा दिसत होता तसे भारताच्या वायुसेनेला पाकिस्तानातील केवळ आतंकवादी तळ दिसत होते. शत्रूचे जीवनोद्देश समजून घेतले, त्याची भौगोलिक परिस्थिती आणि मानसिक अवस्था समजून घेतली आणि त्यात सुसंगती लावण्याइतकी एकाग्रता आपण कमावली, तर शत्रूचा निःपात कसा करायचा ह्याचे मार्ग दिसू शकतात. मग कमीतकमी वेळात आणि कमीतकमी साधनांनिशी लक्ष्य गाठता येते. ह्यातून भारतातल्या सर्वच राजकीय पक्षांना अतिशय महत्त्वाचे धडे शिकता येतील. आपण सांसदीय प्रणाली स्वीकारली आहे. लोकांचे आणि देशाचे पोटापाण्याचे, सुरक्षिततेचे आणि एकंदरीत जिव्हाळ्याचे सर्व प्रश्न संसदेच्या व्यासपीठावर उपस्थित व्हावेत, त्यावर साधकबाधक चर्चा व्हावी आणि राज्यकर्ता पक्ष लोकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी जे काही करू इच्छितो त्याला संविधानिक प्रतिबद्धता यावी म्हणून विशिष्ट आचारसंहिता सिद्ध करण्यात आलेली असत. कोणताही प्रश्न संसदेत उपस्थित करता येतो, त्यावर चर्चा करून सुसंवादाने प्रश्न सुटू शकतो, त्यासाठी हातघाईवर येण्याची आवश्यकता नसते हा विश्वास निर्माण करणे म्हणजे संसदीय प्रणाली आचरणात आणणे. प्रश्नोत्तराचा तास, लक्षवेधी सूचना, स्थगन प्रस्ताव, शून्य प्रहर, अर्धा तास चर्चा अशी अनेक आयुधे असतात, ती लोकांसाठी लढवून सरकारला धारेवर धरता येते, पण त्यासाठी अभ्यास आणि कळकळ लागते. ती नसल्याने बसल्या जागेवरून एकाच वेळी एकसाथ निषेधाच्या घोषणा देणे, हौद्यात उतरणे, राजदंड पळविणे आणि गोंधळ घालून कामकाज होऊ न देणे हा कार्यक्रम सर्व राजकीय पक्ष राबविताना दिसतात. त्यामुळे लोकांचे प्रश्न संसदेसमोर येतच नाहीत.

संसदेच्या सभागृहात येण्याजाण्याचे आणि उठण्याबसण्याचेही नियम आहेत आणि ते काटेकोरपणे पाळले जावे, अशी अपेक्षा असते.सभागृह चालू असताना, सभापती विराजमान असताना राहुल गांधी न विचारता आपले आसन सोडतात. विरोधी सदस्यांच्या पंक्ती मागे टाकून सीमारेषा ओलांडतात, पंतप्रधानांच्या दिशेने कूच करतात, त्यांना आलिंगन देण्याचे नाटक करतात, त्याच पद्धतीने परत येतात, आपले आसन ग्रहण करून कसे बनविले थाटाचा डोळा मारतात हा प्रकार सगळ्या देशाने पाहिला आहे, संसदेच्या नियमांचे इतके बेछूट उल्लंघन आजपर्यंत भारतात तरी कधी झालेले नाही. ग. वा. मावळंकर आणि द. का. कुंटे ह्यांचा काळ असता, तर राहुल गांधींना हक्कभंगाच्या ठरावाला सामोरे जावे लागले असते. निदान त्यांना समज तरी देण्यात आली असती.

दादासाहेब मावळंकर हे स्वतंत्र भारताचे लोकसभेचे पहिले अध्यक्ष. पंतप्रधान नेहरूंनी चिठ्ठी पाठवून चर्चेसाठी त्यांना आपल्या दालनात बोलाविले. मावळंकर गेले नाहीत. त्यांनी नेहरूंना चिठ्ठी पाठविली आणि लोकशाही प्रथा बळकट करण्यासाठी सुरुवातीलाच सगळ्यांनी मिळून चांगले पायंडे पाडू या, असे आवाहन केले. संसद भवनाचा सभापती हा सर्वोच्च असल्याने तो कोणाच्याही दारात जाणार नाही, पंतप्रधानांनी त्यांना भेटायला यावे, असे मावळंकरांनी सांगितले आणि नेहरूंनी ऐकले. सभापतींचा मान न ठेवता सभागृहात प्रवेश केल्याकारणाने नानासाहेब कुंट्यांनी काही मंत्र्यांना सभागृहाबाहेर काढले आहे. हौद्यात उतरणे आणि आरडाओरडा करून चर्चा होऊ न देणे हा सांसदीय आतंकवाद आहे.सदस्यांनी सांसदीय आयुधे वापरून राज्यकर्त्या पक्षाशी खंडनमंडन करावे, अशी अपेक्षा आहे. मोदींनी पाकिस्तानला कमीतकमी शक्ती वापरून उत्तर दिले आहे आणि इष्ट तो परिणाम साधला आहे. ह्यापासून खासदार आणि आमदार ह्यांना शिकण्यासारखे बरेच आहे.

26 फेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिन आहे. प्रायोपवेशन करून 26 फेब्रुवारी 1966ला त्यांनी प्राण सोडला. आक्रमण हीच देशरक्षणाची सर्वोत्कृष्ट राजनीती असते हे शिवाजी महाराजांनी हिंदूंना शिकविले आणि तेव्हापासून हिंदूंना कधी पराभव पत्करावा लागला नाही, असे सावरकर सांगत. शिवाजीच्या काळात शत्रूच्या ताब्यातील प्रदेश हाच मराठ्यांचा टपाली पत्ता होता, असे सावरकर गंमतीने म्हणत. घोड्याच्या पाठीवर राजधानी घालून मराठे चहूदिशांना धुमाकुळ घालीत असत असे सावरकरांनी सांगितले आहे. राघोबादादा लाहोरपर्यंत कसा गेला आणि तेथील शालिमार बागेत त्याचा भव्य सत्कार कसा झाला ह्याचे सुंदर वर्णन हिंदुपदपातशाही ग्रंथात सावरकरांनी केले आहे. आम्ही केवळ संरक्षणासाठी सैन्य ठेवले आहे असे जे म्हणतात ते राज्यकर्ते भ्याड असतात, अशी टीका सावरकर करीत. पाकिस्तान निर्माण झाल्याने हतोत्साहित होण्याची आवश्यकता नाही. औरंगजेबाने ह्यापेक्षा मोठा पाकिस्तान निर्माण केला होता, पण शिवाजीच्या गनिमी काव्याने आणि आक्रमक रणनीतीने मराठ्यांनी तो पाकिस्तान मोडून काढला, तसेच एखाद्या धक्क्याने हाही पाकिस्तान निष्प्रभ होईल असा आशावाद सावरकरांनी दिला. असा अजेय आशावाद म्हणजेच आज लोकप्रिय झालेले मोदींचे अच्छे दिन. त्याची सुरुवात झाली आहे. हिंदूंची मानसिकता बदलली की मुसलमानांचीही बदलेल. त्यासाठी हिंदू मानसिकता स्वपाळू न राहता वास्तववादी, रोखठोक, सकारात्मक आणि पुरुषार्थी झाली पाहिजे. त्यासाठी मुसलमान आतंकवादी आहेत म्हणून आपणही आतंकवादी बनले पाहिजे असा मूर्खपणा न करता केवळ एकाग्र आणि आग्रही बाण्याने हिंदू-मुस्लीम ऐक्य साधणार आहे. आपल्याला मुसलमान बनायचे नसून मुसलमानांना आपण पूर्वी हिंदू होतो ह्याची सन्माननीय जाणीव करून द्यायची आहे.

-अरविंद कुळकर्णी

Check Also

पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागताचा उत्साह

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित शोभायात्रेत लहान मुलांसह महिला, …

Leave a Reply