विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण
देवेंद्र फडणवीस उत्तम मुख्यमंत्री होते यात दुमत नाही -खासदार सुनील तटकरे
पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल परिसराचा वेगाने विस्तार होत आहे. या परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्हावा-शिवडी सी लिंक यांसारखे प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामुळे पनवेल ही तिसरी मुंबई होणार असून येथील महापालिका नावाजलेली महापालिका होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 3) येथे व्यक्त केला. ते पनवेल महापालिका आयोजित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. या सोहळ्यास खासदार सुनील तटकरे व श्रीरंग बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील, माजी मंत्री राम शिंदे, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, आयुक्त गणेश देशमुख, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे तसेच सभापती, नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना आठव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले, तर रायगडचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले की, आज या ठिकाणी विविध कामांचे भूमिपूजन, लोकार्पण आपण केले याचा अतिशय आनंद होत आहे. याचे श्रेय आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त व त्यांच्या सहकार्यांना जाते. पनवेल हे वाढते शहर असून येथील गरजा पूर्ण करण्यासाठी नगर परिषदेची महापालिका झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्यानुसार 2016 साली आपण या महापालिकेची निर्मिती केली. या वेळी खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस उत्तम मुख्यमंत्री होते यात दुमत नाही, असे गौरवोद्गार काढले. इतर मान्यवरांचीही समयोचित भाषणे झाली.
या विकासकामांचे भूमिपूजन…
1) प्रभाग क्रमांक 14 मधील भूखंड क्र. 4, से.16, नवीन पनवेल येथे पनवेल महापालिका मुख्य प्रशासकीय इमारत-’स्वराज्य’चे बांधकाम करणे. 2) प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महाकाली नगर, वाल्मिकी नगर, टपाल नाका, लक्ष्मी वसाहत येथील झोपडपट्टीचा पुनर्विकास करून घरे बांधणे. 3) प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पटेल मोहल्ला व कच्छी मोहल्ला येथील झोपडपट्टीचा पुनर्विकास करून घरे बांधणे. 4) प्रभाग 16मधील भूखंड क्र. 28, से. 11, नवीन पनवेल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र (अकॅडमी) विकसित करणे. 5) प्रभाग 4मधील भूखंड क्र. 151, से. 21 खारघर येथे महापौर निवासस्थान-’शिवनेरी’चे बांधकाम करणे. 6) प्रभाग 7मधील भूखंड क्र. 5, 6, 7 व 8, से. 8ई कळंबोली येथे प्रभाग कार्यालय-’विजयदुर्ग’चे बांधकाम करणे. 7) भूखंड क्र. 13, काळुंद्रे येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे. 8) प्रभाग 13मधील जुई गावामध्ये मल:निस्सारण वाहिन्या टाकणे, पम्पिंग स्टेशन बांधणे व मलःप्रक्रिया केंद्र उभारणे.
या विकासकामांचे लोकार्पण …
1) पनवेल येथील अंतिम भूखंड क्र. 125मधील सुशोभीकरण केलेला वडाळे तलाव. 2) पनवेल येथील अंतिम भूखंड क्र. 127 ‘अ’मधील प्राथमिक मराठी कन्याशाळेची इमारत. 3) प्रभाग क्र. 13मधील सुशोभीकरण केलेला जुई गावामधील तलाव. 4) अमृत अभियान अंतर्गत पाणीपुरवठा योजनेतून पनवेल येथील मार्केट यार्ड, तक्का रोड, इच्छापूर्ती गणेश मंदिर, हरीओम नगर, एचओसी कॉलनीजवळील उभारलेला उंच जलकुंभ.