माणगाव : प्रतिनिधी
ताम्हाणी घाटातील कोंडेथर गावाच्या हद्दीत एका अवघड वळणावर शुक्रवारी (दि. 3) दुपारी सँट्रोकार पलटी होऊन झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत.
राहूल प्रकाश पंडित (वय 42, रा. विश्रांतीवाडी, पुणे) हे त्यांच्या ताब्यातील सँट्रोकार (एमएच-12,सीडी-8943) घेऊन शुक्रवारी दुपारी पुणे बाजूकडून माणगावकडे येत होते. कोंडेथर गावाच्या हद्दीत ताम्हाणी घाटातील एका अवघड वळणावर भरधाव वेगात असलेली त्यांची कार पलटी होऊन खोल दरीत पडली. या अपघातात कारमधील प्रकाश मुरलीधर पंडित (वय 73, रा. विश्रांतीवाडी पुणे) यांचा मृत्यू झाला तर कारमधील गौरी राहुल पंडित (वय 37), प्रणीला प्रकाश पंडित, सान्वी राहुल पंडित, अर्जुन राहुल पंडित, मंजुश्री कवी पंडित, आणि चालक राहुल प्रकाश पंडित हे सहा जण जखमी झाले.
या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास श्री. तोरवे करीत आहेत.
पेण : प्रतिनिधी
तालुक्यातील वरसई गावच्या हद्दीत शुक्रवारी (दि. 3) दुपारी भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
गागोदे खुर्द गावाचे हद्दीतून जाणार्या वरसई रोडच्या वळणावर शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चालक अनिल दत्तात्रेय लखिमळे (रा. वाक्रूळ, ता. पेण) यांच्या इको कार (एमएच-06,बीडब्ल्यु-3612) ने दुचाकी (एमएच-06, बीवाय-8770) धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार सुभाष दत्तात्रेय पवार (रा. मायनी, ता. पेण) आणि पूजा संतोष रिंगे (वय 22, रा. खरोशी, ता. पेण) जखमी झाले असून त्यांना पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही वाहनाचे नुकसान झाले.
या अपघाताची नोंद पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक कौशिक फेंगडू करीत आहेत.