प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी केली पाहणी
मुरूड ः प्रतिनिधी
तालुक्यातील मांडला गावाला पावसाळ्यात उद्भवणार्या संभाव्य पूराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने गावाशेजारील नदीतील गाळ काढण्याचे काम तातडीने सुरु केले आहे. त्यामुळे संभाव्य पूराच्या पार्श्वभूमीवर गावाला दिलासा मिळाला आहे. अलिबागाचे प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी नुकतीच या कामाची पाहणी केली.
मुरूड तालुक्यातील मांडला ग्रामपंचायत हद्दीतील नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने पावसाळ्यात नदीला पूर येऊन, गावात पूराचे पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर या नदीतील गाळ काढण्यात यावा, यासाठी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच सुचिता सुरेश पालवणकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, प्रांताधिकारी प्रशांत ढगे, तहसीलदार रोहन शिंदे यांच्याकडे निवेदन देवून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला होता.
या कामाबाबत मागील ग्रामसभेमध्ये असगर दळवी यांच्या सूचनेनुसार सरपंच सुचिता पालवणकर, उपसरपंच राजेश पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, कर्मचारी, ग्रामस्थ यांनी तातडीने दखल घेवून ग्रामपंचायत स्तरावर योग्य तो निर्णय घेऊन कामाला तात्काळ सुरुवात केली. आज हे काम प्रगतीपथावर आहे.
मांडला नदीतील गाळ काढण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री येथील प्रकल्प विकासक तैजून निसार हन्सोजी यांनी विनामोबदला उपलब्ध करून दिली आहे. भविष्यात यापुढे काम पूर्ण होईपर्यंत योग्य ते सहकार्य देण्याची खात्री हन्सोजी यांच्यावतीने जाहीद कादीरी यांनी दिली.
दरम्यान, प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन बैठकीत नदीतील गाळ उपसा कामाबाबत समाधान व्यक्त करुन पुढील कामाबाबत मार्गदर्शक सूचना केल्या. नदीतील उर्वरित गाळ काढण्यासाठी सरकारस्तरावर योग्य ते सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले. या बैठकीत तहसीलदार रोहन शिंदे, सरपंच सुचिता पालवणकर, उपसरपंच राजेश पाटील यांच्यासह अन्य सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.