पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या ढवळी येथील राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील विद्यालयाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून 50 लाख रूपयांच्या मदतीचा धनादेश रयतचे चेअरमन अनिल पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी सोबत संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दिवंगत एन. डी. पाटील यांचे नातू सागर पाटील यांच्या नावाने ही शाळा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात ढवळी या एन. डी. पाटील यांच्या गावी उभारण्यात आली आहे. सागर पाटील यांनी वयाच्या पाचव्या वर्षांपासून उत्कृष्ट जलतरणपटू म्हणून नाव कमवायला सुरुवात केली होती. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देश-विदेशांतील स्पर्धांमधून सागर पाटील यांनी जलतरणपटू म्हणून नाव कमावले होते. स्वबळावर मिळालेल्या स्कॅालरशिपवर 12वी नंतरचे शिक्षण घेण्यासाठी सागर पाटील हे लंडनला गेले, मात्र दुर्देवाने त्यांना ब्लड कॅन्सर झाला. वयाच्या 17व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
सागर पाटील यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या आणि परिसरात प्रथम क्रमांकावर असलेल्या याशाळेच्या मुख्याध्यापिका एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील आहेत. या शाळेत कौशल्य आधारित वर्ग सुरू करण्यात येत आहेत. या वर्गात 25 वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या वर्गांसाठी एक कोटी रूपये खर्च आहे. त्यापैकी 50 लाख रूपयांचा धनादेश लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
‘रयत’च्या शाळेसाठी रामशेठ ठाकूर यांनी वेळोवेळी मोठ्या मनाने मदत दिली आहे. या शाळेला तर त्यांनी यापूर्वीही मदत केली आहे. रामशेठ हे तर मला मुलासारखेच आहेत. त्यांची पत्नी शकुंतला, दोन्ही मुले आणिसुना या कायम आपुलकीने मदतीला तयार असतात.
-सरोज पाटील, मुख्याध्यापक, राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील विद्यालय, वाळवा