Breaking News

म्हसळ्यात पोलिसांची कडक कारवाई

कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर उगारला बडगा

म्हसळा : प्रतिनिधी – लॉकडाऊन व संचारबंदी असूनही रस्त्यावर विनाकारण फिरणारे नागरिक तसेच दुचाकीचालकांवर म्हसळा पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारत कारवाई केली. या वेळी नागरिकांना समज देण्यात आली, तर दुचाकी जप्त करून त्यांना दंड करण्यात आला.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. असे असूनही म्हसळा शहरातील काही नागरिक संचारबंदी झुगारून संध्याकाळी म्हसळा बायपासला फिरावयास जातात अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तेथे जाऊन पाहिले असता, 15 जण रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून आले. त्यांना ताब्यात घेऊन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 68प्रमाणे समज देऊन सोडून देण्यात आले.

दुसरीकडे वाहनचालकांवरही कारवाई करण्यात येत आहे. नाकाबंदी करीत असताना एक दुचाकीस्वार अत्यावश्यक सेवेचा स्टीकर लावलेली आपली दुचाकी कर्कश हॉर्न वाजवित पुढे आला. कर्तव्यावर हजर असलेल्या वाहतूक पोलिसाने संबंधित दुचाकीस्वाराला इशारा करून तत्काळ थांबविले. पोलिसाने वाहनचालकाजवळ लाससन्स व अन्य कागदपत्रांची मागणी केली असता, कोणतेही कागदपत्र त्याने दाखविले नाही.

कर्कश हॉर्न वाजविणे, आदेश न मानणे, लायसन्स व अन्य कागदपत्र न दाखविणे या अंतर्गत मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी या वाहनचालकाला पोलिसांनी दंड आकारला. या वेळी अन्य दुचाकीस्वारांनी लायसन्स व अन्य कागदपत्रे पटापट दाखवून पोलिसांची सहानुभूती मिळवली, तर एका खाजगी डॉक्टरने सर हेल्मेट घालायला विसरलो, परत अशी चूक होणार नाही  असे म्हणत कडक पोलिसांचे मन नम्रतेने जिंकले.

टाळेबंदीमुळे वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. वाहन अत्यावश्यक सेवेत वापरात असेल तरी त्याचे संबंधित सर्व कागदपत्र वाहतूक पोलिसांना दाखविणे बंधनकारक आहे.

-धनंजय पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, म्हसळा पोलीस ठाणे

Check Also

उलवे नोडमध्ये ग्रेसवेल हॉस्पिटलचे उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती

उलवे नोड : रामप्रहर वृत्त सेवाभाव मनामध्ये ठेवून काम करा. ग्रेसवेल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी येणारा …

Leave a Reply