Breaking News

युवा आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

हाँगकाँग : वृत्तसंस्था

युवा आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताने एकूण 27 (8 सुवर्ण, 10 रौप्य व 9 कांस्य) पदकांची कमाई करीत दुसरे स्थान पटकाविले. चीनने सर्वाधिक 12 सुवर्ण, 10 रौप्य व 9 कांस्य अशी 31 पदकांची कमाई केली; तर जपानने 6 सुवर्ण, 8 रौप्य व 6 कांस्य अशा 20 पदकांसह तिसरे स्थान मिळवले.

भारतीय मुलांच्या मिडले रिले संघाने सुवर्ण कामगिरी केली. करण हेगिस्टे, शनमुगा नालुबोठू, शशिकांत अंगदी व अब्दुल रझाक यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने 1:54.04 मिनिटांची वेळ नोंदवत सुवर्णपदकावर नाव कोरले. भारतीयांच्या शानदार वर्चस्वापुढे श्रीलंका (1:55.04) व चीनच्या (1:55.45) संघाला अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकांवर समाधान मानावे लागले.

मुलींच्या मिडले रिले प्रकारात अवंतिका, दीप्तीसह पणिता पिंचाई व सुकंदा पी. यांचा समावेश असलेल्या भारतीय संघास 2:10.87 मिनिटांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चीनच्या मुलींनी सुवर्ण पटकावत 2:10.71 मिनिटांची वेळ दिली. कझाकिस्तानने कांस्य जिंकले.

आधी ऐतिहासिक सुवर्ण जिंकणार्‍या पुण्याच्या अवंतिका नराळेने नंतर आणखी दोन पदकांची कमाई केली. तिने 200 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले. याच शर्यतीत भारताच्याच दीप्ती जीवांजीने कांस्य जिंकले. मुलींच्या रिले संघातही अवंतिकाचा सहभाग होता.

100 मीटर शर्यतीत अवंतिकाने 11.97 सेकंदांच्या वेळेसह बाजी मारत युवा गटात आशियातील सर्वात जलद धावपटू होण्याचा मान पटकावला होता. मुलींच्या 200 मीटर शर्यतीत चीनच्या युतिंग लीने 23.83 सेकंदांची वेळ नोंदवत स्पर्धा विक्रमासह सुवर्ण पटकावले. तिच्या वेगापुढे अवंतिका आणि दीप्ती यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

दुसरीकडे, नालूबोथू शनमिगा श्रीनिवास (200 मीटर) याने रौप्य, 3 हजार मीटर शर्यतीमध्ये अमित जांगिर याने रौप्य, पूजाने 800मी शर्यतीत रौप्य, 800मी मुलांच्या शर्यतीत महेश बाबू आणि सुमित खारब यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य, अमनदीपसिंग धालिवालने गोळाफेकीत रौप्य व चंथिनी चंदनने 1500मी. शर्यतीत कांस्य पटकावून भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply