पाली : प्रतिनिधी
रायगड़ जिल्ह्यातील पेण तालुक्यातील विराणी आदिवासीवाडीत तीन दिवसीय निसर्ग साहस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विविध साहसी खेळांचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. या शिबिरात सीएफआय या आंतरराष्ट्रीय संस्थेतील व मुंबई, पुण्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. राधा व रोहन मनोरे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात विद्यार्थ्यांनी 50 फुट रॅपलिंग आणि 125 फुट झिप लाइन आदी साहसी प्रकार स्वतः केले. या वेळी विविध नाविन्यपूर्ण खेळातून विद्यार्थ्यांना गटात काम करणे व नेतृत्वगुण विकास आदींचे प्रशिक्षणदेखील देण्यात आले. या शिबिरातील विद्यार्थी तीन दिवस आदिवासी बांधवांबरोबर राहिले. या माध्यमातून आदिवासी संस्कृती व जीवनमान आदींची महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. यावेळी विद्यार्थ्यांनी म्हशीचे दूध काढण्याचा आनंद घेतला. तंबूत दोन रात्री घालवल्या. या शिबिराचे आयोजक रोहन व राधा मनोरे यांनी सांगितले की, 2006 पासून आम्ही विविध साहस शिबिरांचे आयोजन रायगड जिल्ह्यात तसेच महाबळेश्वर आदी वेगवेगळ्या ठिकाणी करीत आहोत. रायगड जिल्ह्यासह पुणे, मुंबई व इतरही ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. या शिबिरातून विद्यार्थ्यांना निसर्गाशी मैत्री करता येते. आगामी शिबिर ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात येणार आहे, असे आयोजक रोहन व राधा मनोरे यांनी या वेळी सांगितले.