राज्याचा निकाल 94.22 टक्के; मुली ठरल्या सरस
मुंबई : प्रतिनिधी
राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के इतका लागला आहे. या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला आहे, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 95.35 टक्के, तर मुलांचा 93.29 टक्के लागला आहे.
यंदा बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 1449664 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 1439731 जण प्रविष्ट झाले आणि त्यातून 1356604 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातर्फे 17 जूनला गुणपत्रिका दिल्या जाणार आहेत.
मुंबई विभागात रायगड अव्वल
अलिबाग ः बारावीच्या परीक्षेत रायगड जिल्ह्याचा निकाल 93.11 टक्के लागला असून यंदा रायगडने मुंबई विभागात अव्वल स्थान मिळवले आहे. जिल्ह्यात सुधागड तालुक्याचा निकाल सर्वाधिक 98.21 टक्के, तर पोलादपूर तालुक्याचा सर्वांत कमी 71.85 टक्के लागला आहे. याशिवाय म्हसळा 98.10 टक्के, पनवेल 97.47 टक्के, अलिबाग 96.53 टक्के, श्रीवर्धन 95.41 टक्के, तळा 95.33 टक्के, माणगाव 95.09 टक्के, पेण 94.47 टक्के, उरण 92.59 टक्के, रोहा 91.70 टक्के, महाड 90.87 टक्के, कर्जत 89.65 टक्के, खालापूर 77.74 टक्के, मुरूड 74.56 टक्के असा निकाल लागला आहे.