Breaking News

समाजमाध्यमांचा वापर करीत योग दिन साजरा

माणगाव ः प्रतिनिधी – जागतिक योग दिनाचे औचित्य साधून या वर्षी रविवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक व विद्यार्थ्यांनी घरीच योग दिन उत्साहात साजरा केला. प्रतिवर्षी योग दिनाचे औचित्य साधून शासकीय व सार्वजनिक संस्था विविध प्रकारचे कार्यक्रम व योग शिबिर आयोजित करतात. या वर्षी मात्र कोरोनाच्या संकटामुळे शाळा, कॉलेजेच बंद असून सार्वजनिक कार्यक्रमांस असलेले निर्बंध लक्षात घेऊन अनेकांनी घरीच योग दिन साजरा करून विविध आसने व प्राणायामचा घरच्या घरी कुटुंबासह अभ्यास केला.

   अनेक शाळा व सार्वजनिक संस्थांनी मोबाइल व समाजमाध्यमांचा उपयोग करून योग दिनाची माहिती व विविध योग कसे करावेत याविषयी जनजागृती केली. या माहितीचा आधार घेत विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांनी योग दिन उत्साहात साजरा केला. शिक्षक, विद्यार्थी व पालकांसह सरकारी-निमसरकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी घरच्या घरी योग व सूर्यनमस्कार करून आनंदाने सहभाग घेतला. धकाधकीच्या जीवनात शरीर व मन निरोगी राहण्यासाठी योगाचे महत्त्व लक्षात घेऊन अनेक शाळांनी शासकीय परिपत्रकानुसार सकाळ सत्रात शाळा भरवून किमान एक तास योग व आसनांचा विद्यार्थ्यांकडून सराव करवून घेतला.

 योगासनांमुळे शरीर व मन निरोगी राहते. मनुष्य ताणतणावातून मुक्त होतो. मन एकाग्र झाल्यामुळे बुद्धीला चालना मिळते. त्यामुळे विद्यार्थी व सर्वसामान्यांनी दररोज योगासने करायला हवीत.

-भरत काळे, क्रीडा शिक्षक

दरवर्षी आम्ही शाळेत शिक्षकांच्या सूचनांप्रमाणे योग दिन साजरा करतो. या वर्षी कोरोनामुळे शाळेला सुटी आहे, मात्र शिक्षकांनी आम्हाला व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून सूचना व माहिती दिली. त्याप्रमाणे आम्ही घरीच विविध योगासने व सूर्यनमस्कार घातले. या वेळचा अनुभव अतिशय चांगला होता.

-प्रेरणा तेलंगे, विद्यार्थिनी

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply