नवी मुंबई : बातमीदार
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील परिसरात गणपतशेठ तांडेल मैदानाच्या बाजूला बुध्दा बेली बांबूच्या 1000 वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणात लोकसहभाग हे सूत्र नजरेसमोर ठेवून या वृक्षारोपणामध्ये सायकल क्लब ऑफ इंडिया या पर्यावरणप्रेमी स्वयंसेवी संस्थेच्या 185 सदस्यांनी उत्साहाने सहभागी होत वृक्षलागवड केली. या ठिकाणी बुध्दा बेली बांबू या वातावरणातील ऑक्सिजन वाढण्यासाठी पूरक असणार्या विशिष्ट प्रकारच्या बांबूची लागवड केल्यामुळे वायू शुध्दतेसाठी मदत होईल, तसेच या बांबूचा उपयोग ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक आणि वायू प्रतिबंधक म्हणूनही होईल. हे बांबूचे वृक्षारोपण मियावाकी शहरी जंगलाच्या वृक्ष लागवडीपासून जवळच केलेले असल्यामुळे पक्षी, किटक व फुलपाखरे यांची वाढ होऊन येथील जैवविविधतेत लक्षणीय भर पडणार आहे. त्याचप्रमाणे या बांबूची लागवड पक्षांना घरटी करण्यासाठीही उपयुक्त असल्याने पक्ष्यांचा वावर वाढणार आहे. प्रशासन व उद्यान विभागाचे उपआयुक्त जयदीप पवार, परिमंडळ 1 चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, बेलापूर विभागाच्या सहा. आयुक्त मिताली संचेती, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे, उद्यान अधिक्षक. विजय कांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न झाले. नवी मुंबईची ओळख पर्यावरणशील शहर म्हणूनही अधोरेखित होत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वृक्षारोपणाप्रमाणेच वृक्ष संवर्धनाकडेही महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष दिले जात आहे. मागील दोन वर्षांत दोन लाखांहून अधिक वृक्षरोपांची लागवड करण्यात आलेली आहे. सेक्टर 28 नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथेही मियावाकी पध्दतीने 1 लक्ष 23 हजार देशी प्रजातीच्या वृक्षरोपांची लागवड करण्यात आलेली असून हा देशातील सर्वांत मोठा मियावाकी पध्दतीचा शहरी जंगल प्रकल्प आहे. याच परिसरात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 1 हजार बुध्दा बेली बांबूच्या वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. या वेळी माझी वसुंधरा अभियानाची शपथ सामुहिकरित्या ग्रहण करण्यात आली.