दररोजचे काम मिळत नसल्याने मंदीचे सावट
पनवेल : वार्ताहर
पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यांसह परराज्यातून अनेक कुटुंबे शहरांकडे येतात. दररोज सकाळी शहरातील नाक्यांवर उभे राहून मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात सकाळी नाक्यांवर एक प्रकारे मजुरांचा बाजाराच भरलेला असतो, परंतु नाक्यावर सर्वांना दररोज काम मिळत नसल्याने कामगार वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यासह देशातील विविध भागांतील अनेक कुटुंबे रोजगाराच्या शोधात पुन्हा शहरांकडे वळली आहेत नाक्यावर मिळतील ती मजुरीची कामे करून कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अनेक व्यवसायांमध्ये अद्याप मंदीचे सावट आहे. याचा फटका नाका कामगारांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. नाक्यांवर दररोज काम मिळत नसल्याने पोट भरण्याची चिंता या कामगारांना लागली आहे. काम मिळत नसल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ लागली आहे.
पनवेल शहरातील मिडल क्लास हौसिंग सोसायटी कोहिनुर टेक्निकल समोर तसेच नवीन पनवेल येथील गणेश मार्केट समोरील रस्त्यावर असलेल्या पार्किंगमध्ये कामगार नाका आहे. या नाक्यावर बांधकाम करणारे मिस्री, बिगारी, प्लम्बर, पेंटर, वायरमन, सुतार आदी कामगार उपलब्ध असतात, परंतु सध्या काम मिळत नसल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ लागली आहे.