Breaking News

गणेश पाटील यांना गुणवंत कामगार पुरस्कार

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील प्रकल्पग्रस्त म्हणून 1980 साली कल्याण कोळशेवाडी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या सेवेत कार्यरत असलेले बोकडविरा गावातील गणेश रामचंद्र पाटील यांनी 40 वर्षात वीज मंडळात प्रामाणिकपणे करण्यात आलेल्या सेवेची दखल वीज महामंडळाने घेऊन त्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित केले असून, सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गणेश पाटील बोकडविरा गावाचे रहिवासी असून, सिडकोच्या जमीन संपादनानंतर त्यांचे चुलते सुप्रसिद्ध राज्यस्तरीय कबड्डीपटू कै. चंद्रकांत पाटील उर्फ सी. एफ. पाटील यांच्या औदार्यामुळे ते प्रकल्पग्रस्त म्हणून तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या सेवेत 1980 साली कल्याण कोळसेवाडी येथे कार्यरत झाले होते. आपल्या मधुरवाणीने विद्युत ग्राहकांबरोबर चांगले संबंध ठेवून त्यांच्या तक्रारी दूर करणे अशा प्रकारे प्रामाणिक सेवा बजावत असताना आपल्या चुलत्याकडून कबड्डीचे धडे गिरविले असल्याने त्यांच्या कबड्डी खेळाचा वसा सांभाळत मंडळाच्या आपल्या कबड्डी स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन मंडळाच्या आपल्या विभागात विजयश्री खेचून आणून त्यांनी आपल्या सेवा कार्यालयात उत्तम कामगिरीही बजावली होती.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विभाजन झाल्याने ते कंपनीच्या वीजवितरण विभागात आपली सेवा बजावत असताना कल्याण येथे तीन वर्षे, त्यानंतर पेण विभागात 18 वर्षे, तर पनवेल विभागात 19 वर्षे त्यांनी असा आपला 40 वर्षांचा सेवा कार्यकाल पूर्ण केला. त्यांच्या कार्याची आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील प्रामाणिक सेवेची दखल घेत कंपनीने 2019चा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर केला होता, परंतु 31 मार्च 2019 रोजी ते कंपनीच्या प्रदीर्घ 40 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले होते.

तरीसुद्धा कंपनीतील कार्याचा उचित गौरव कंपनीच्या कार्यालयात भांडुप विभागाच्या परिमंडळ अधीक्षक अभियंता श्रीमती पुष्पलता चव्हाण यांच्या हस्ते आणि नवी मुंबई विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. नाईक, तसेच ठाणे-कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत गुणवंत कामगार पुरस्कार त्यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्त झाल्याने श्री. पाटील यांच्या परिवारात आनंदाचे वातावरण असून बोकडवीरा ग्रामस्थ, गणेश क्लब बोकडवीरा, त्यांचे हितचिंतक यांनी त्यांचे अभिनंदन केले. सेवा निवृत्तीनंतरही गुणवंत कामगार पुरस्कार मिळवणारे या विभागातील गणेश पाटील हे एकमेव कामगार आहेत.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply