Breaking News

खालापुरात शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने!

नियोजित रॉकिंग बॉम्बे बेव्हरेज कारखान्याच्या जनसुनावणीदरम्यान संघर्ष

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यातील प्रस्तावित मे. रॉकिंग बॉम्बे बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या शुक्रवारी (दि. 10) झालेल्या जनसुनावणीदरम्यान शिवसेना व राष्ट्रवादी आमने-सामने उभे ठाकल्याचे चित्र पहायला मिळाले.

धान्यापासून  इथेनॉल व एक्स्ट्रा अल्कोहॉल उत्पादन करणार्‍या बहुचर्चित मे. रॉकिंग बॉम्बे बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी खालापूर तालुक्यातील उसरोली व खानाव ग्रामपंचायत हद्दीत कारखाना उभारणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, खालापूर तालुका प्रशासनाकडून शुक्रवारी जनसुनावणी घेण्यात आली होती. या जनसुनावणीत शिवसेना सोडून अन्य सर्व पक्षीय नेत्यांनी व बहुसंख्य स्थानिक नागरिकांनी विकासाच्या बाजूने कौल देत सदर कारखाना उभासरणीचे जोरदार स्वागत केल्याने शिवसेना मात्र एकटी पडली. प्रदूषण व अन्य कारणे सांगून प्रस्तावित कारखान्याला शिवसेनेने केला विरोध केला.

रायगडच्या अप्पर जिल्हा अधिकारी पद्मश्री बैनाडे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली व तहसीलदार आयुब तांबोळी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे रायगड प्रादेशिक अधिकारी वी. वी. किल्लेदार यांच्या उपस्थितीत ही जनसुनावणी घेण्यात आली. या जनसुनावणीला प्रस्तावित कारखाना क्षेत्रातील  बाधित गावे व दहा किमी परिसरातील ग्रामस्थ, सर्वपक्षीय नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. अंदाजित 300 कोटींची गुंतवणूक असलेल्या व सुमारे 250 जणांना रोजगार व  नोकर्‍या देणार्‍या या कारखान्यात धान्यावर प्रक्रीया करून दररोज 125 केएलपीडी इथेनॉल व 125 केएलपीडी एक्स्ट्रा अल्कोहोल निर्मिती करण्यात येणार आहे. जनसुनावणीत कारखाना व्यवस्थापनच्या तांत्रिक, पर्यावरण व औद्योगिक सुरक्षा विभागाकडून कारखान्याची उत्पादन प्रणाली, कच्चा माल, इंधन, पर्यावरण संवर्धन यासाठी उभारण्यात येणार्‍या यंत्रणा व उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

जनसुनावणीत शिवसेना नेते रघुनाथ शिंदे, रोहित विचारे, उमेश गावंड व अन्य पदाधिकार्‍यांनी कंपनीमुळे प्रदूषण वाढेल व त्यातून स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, असे सांगून कारखान्याला विरोध केला. दुसरीकडे माजी जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नरेश पाटील, कंपनी परिसरातील  देवन्हावे सरपंच अंकित साखरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष एच. आर. पाटील, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. संतोष बैलमारे, युवक पदाधिकारी भूषण पाटील, भाजपचे सनी यादव   यांच्यासह उसरोलीचे सरपंच, पंचक्रोशीतील सर्व पक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी मात्र कंपनी आल्यावर स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार व अन्य उद्योग उपलब्ध होऊन परिसराचा विकास होईल म्हणून, कारखाना उभासरणीला समर्थन देत स्वागत केले.

या जनसुनावणीदरम्यान स्थानिक स्तरावर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष प्रकर्षाने प्रगट झाला व काहीवेळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र जनसुनावणी अधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी वेळोवेळी हस्तक्षेप व महत्त्वाच्या सूचना करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

प्रस्तावित कारखाना निर्मिती संदर्भात या जनसुनावणीच्या माध्यमातून स्थानिक ग्रामस्थांची तोंडी व लेखी स्वरूपात मते जाणून घेण्यात आली. ज्यांचा विरोध आहे, त्यांच्या विरोधामागील कारणेही समजून घेतली आहेत. या संदर्भातील सविस्तर अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर केला जाईल.

-पद्मश्री बैनाडे, जनसुनावणी प्रमुख व अप्पर जिल्हाधिकारी, रायगड

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply