नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नेरूळ येथील सेक्टर 17 मध्ये शनिवारी (दि. 11) दुपारी भीषण दुर्घटना घडली. जिमी पार्क इमारतीच्या ए विंगमधील 6 व्या मजल्यापासून सर्व घरांच्या हॉलचा स्लॅब पहिल्या माळ्यापर्यंत पत्त्याप्रमाणे कोसळला. यात एक 29 वर्षीय तरूण ठार तर सात रहिवाशी गंभीर जखमी झाले.
आचानक घडलेल्या या प्रकारामुळे इमारतीमधील रहिवाशी आणि परिसरातील नागरिक यांची एकच पळापळ उडाली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना ढिगार्या बाहेर काढले आणि नजीकच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. ज्या सहा मजल्यापासून ह़ॉलचा भाग तळमजल्यापर्यंत कोसळून ही दुर्घटना घडली.त्यामध्ये 6 मजल्यावरील घरामध्ये लादी बसवण्याचे काम सुरू होते.
नेरुळ येथील सेक्टर 17 मधील जिमी पार्क ही इमारत प्लॉट नंबर 182 डी येथे ही नऊ माळ्यांची इमारत आहे. या इमारतीला 1994 साली महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र दिलेले आहे. आज दुपारी 12.30 च्या सुमारास इमारतीच्या ए विंगमधील सहाव्या माळ्यावरील घराच्या हॉलचा संपूर्ण स्लॅब पाचव्या माळ्यावरील घरात कोसळला. त्यामुळे पाचव्या माळ्यावरील हॉलचा स्लॅबही खाली कोसळत अशा पध्दतीने पहिल्या माळ्यापर्यंत सर्वच घरातील हॉलचे स्लॅब कोसळले. या दुर्घटनेत व्यंकटेश नाडर (29) हा तरूण जागीच ठार झाला असून सुब्रमण्यम त्यागराजन (84), निशा धर्मानी (50), रिया धर्मानी (20), सोनाली गोडबोले (29), आदित्यराज गोडबोले (15), सौमित्र गोडबोले (50) आणि ललिता त्यागराजन (80) हे सात जण जखमी झाले. त्यांना तातडीने नजीकच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जिमी पार्क इमारत अतिधोकादायक यादीमध्ये नाही, परंतू या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घेण्याबाबत या सोसायटीला महापालिकेने नोटीस दिली होती. मात्र स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. ही दुर्घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, हे जाणून घेण्यासाठी तज्ञांचे पथक घटनास्थळी पाठवले आहे. तसेच व्हीजेटीआयकडूनही या इमारती स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्यात येणार आहे. इमारत खाली करुन येथील नागरीकांची व्यवस्था शहरातील भवन व नेरुळ येथील समाज मंदीर येथे करण्यात आली आहे, असे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.