राज्यसभा निवडणुकीनंतर ना. नारायण राणे आक्रमक
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारत शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाची धूळ चारली. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते रविवारी (दि. 12) सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.
राज्यसभेवर निवडून आलेल्या भाजप उमेदवारांचे अभिनंदन करीत सिंधुदुर्ग जिल्हा भाजपकडून जल्लोष करण्यात आला. या वेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती होती.
’शिवसेना सांगत होती की महाविकास आघाडी तिन्ही जागा जिंकणार, पण शेवटी काय झाले? संजय राऊत तर काठावर पास झाले. त्यांना महाविकास आघाडीची मते मिळायला हवी होती. तेवढीही मते त्यांना मिळली नाहीत. शिवसेनेची स्वत:ची मते त्यांच्या उमेदवाराला मिळालेली नाहीत. महाविकास आघाडीचे आठ ते नऊ आमदार फुटले आहेत. याचाच अर्थ सरकार अल्पमतात आले आहे. बहुमतासाठी 145 आमदारांचे पाठबळ लागते. तुमच्याकडे तेही नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. नैतिकतेचे भान असेल तर राजीमाना द्या आणि बाजूल व्हा,’ अशी टीका करीत ना. नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
आतापर्यंतच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांनी जी भाषा वापरली नाही त्या भाषेत उद्धव ठाकरे बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत होते. आम्ही वाघ आहोत, अमूक आहोत असे म्हणत होते. जी भाषा वापरायला नको होती ती भाषा वापरल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाचक्की आणि बेअब्रुपण झाली, अशी खोचक टीका ना. राणे यांनी केली.
तुम्ही महाराष्ट्राला 10 वर्षे मागे नेले आहे. सत्तारूढ आणि विरोधक यांच्यात लोकशाहीमध्ये जे नाते असते ते नाते तुम्ही या निमित्ताने धुळीला मिळवले. तुम्हाला सत्तेवर राहायचा नैतिक अधिकार नाही. स्वत:चे आमदार सांभाळू शकत नाहीत आणि बढाया मारतात, असा टोलाही राणे यांनी लगावला.
शरद पवारांकडून काहीतरी शिका!
लोकांना आपलेसे करण्यात त्यांना यश आले, असे म्हणत राज्यसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले होते. यावरून ना. नारायण राणे यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना शालजोडीतील लगावली आहे. ’मी संजय राऊत यांना किंमत देत नाही, त्यांनी शरद पवारांकडून काहीतरी शिकावे,’ असे ना. राणे यांनी या वेळी म्हटलेे.