नाविक तळावर अखेरची मानवंदना; 36 वर्षांची अविरत सेवा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
तब्बल 36 वर्षांच्या भारतीय नौदलातील सेवेनंतर ‘आयएनएस रंजीत’ या क्षेपणास्त्र विनाशिकेने (मिसाइल डिस्ट्रॉयर) सोमवारी नौदलातून निवृत्ती घेतली. विशाखापट्टणम येथील नाविक तळावर या विनाशिकेला अखेरची मानवंदना देण्यात आली. 1983 साली ‘आयएनएस रंजीत’ ही विनाशिका भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू झाली होती.
सोव्हिएत महासंघाने तयार केलेल्या काशीन श्रेणीतील पाच विनाशिकांमधील ही तिसरी विनाशिका आहे. युक्रेनमधील कोमुनारा शिपबिल्डींग प्रकल्पात ‘आयएनएस रंजीत’ची उभारणी करण्यात आली होती. त्यानंतर प्रोजेक्ट ‘61 एमझेड’ अंतर्गत या विनाशिकेला ‘पोराझायुश्ची’ हे नाव देण्यात आले. ‘नाटो’च्या यादीमध्ये या विनाशिकेला काशिन क्लास असे संबोधले गेले आहे. 16 जून 1979 रोजी ही विनाशिका लॉन्च करण्यात आली आणि त्यानंतर 30 ऑक्टोबर 1981 साली सोव्हिएत महासंघाच्या नौदलात या विनाशिकेला सामील करून घेण्यात आले होते. त्यानंतर ही विनाशिका भारतीय नौदलाला देण्यात आली. भारतीय नौदलात सामील झाल्यानंतर या विनाशिकेचे नामांतरण ‘आयएनएस रंजीत’ असे करण्यात आले.
‘आयएनएस रंजीत’ या विनाशिकेचे वजन 3950 टन असून गाईडेड मिसाइल डिस्ट्रॉयर ही तिची खासियत होती. 4 गॅस टर्बाइन इंजीन आणि यात लावण्यात आलेले दोन शेफ्टमुळे या विनाशिकेला 72 हजार हॉर्स पॉवरची ताकद मिळत होती. नौदलात सामील झाल्यानंतर या विनाशिकेने जगाच्या 35 फेर्या होतील इतक्या म्हणजेच 7 लाख 43 हजार समुद्री मैलांचा प्रवास केला आहे.
सध्या भारतीय नौदलाच्या ताफ्यात असलेल्या विनाशिकेतील दिल्ली श्रेणीतील विनाशिकेची निर्मिती भारतातच करण्यात आली आहे. त्यानंतर नौदलात सामील झालेल्या ‘आयएनएस कोलकाता’ची निर्मितीदेखील भारतातच करण्यात आली आहे. 2014 ते 2016 या कालावधीत या विनाशिकांना भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू करण्यात आले. त्यानंतर 2018 साली ‘आयएनएस विशाखापट्टणम’देखील नौदलात सामील करण्यात आली, तसेच गेल्या महिन्यात ‘आयएनएस इम्फाळ’ ही विशाखापट्टणम श्रेणीतील विनाशिका लॉन्च करण्यात आली. प्रोजेक्ट ‘15 बी’ अंतर्गत तयार केलेली ही तिसरी विनाशिका आहे. सध्या या युद्धनौकेचे परीक्षण सुरू असून पुढील काही वर्षांमध्ये ही नौदलाच्या सेवेत रूजू होईल.