पनवेल : वार्ताहर
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे व रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिल्याबद्दल सर्वपक्षीय कृती समितीचे जाहीर आभार मानले आहे.सिडको प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे आधारस्तंभ लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावे म्हणून अनेक आंदोलने करण्यात आली. आर पी आय आठवले गटाचे कोकण प्रदेश अध्यक्ष जगदिश गायकवाड यांनी केलेल्या आंदोलनामुळे त्यांना तडीपारीची काही दिवसाची सजा भोगावी लागली. माजी खासदार रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व प्रकल्पग्रस्तांना एकत्र करून आंदोलने केली. आमदार महेश बालदी, नवी मुंबईचे लोकनेते गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे अशा अनेक मान्यवरांनी विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी हजारो भूमिपूत्रांना एकत्र घेउन अनेक वेळा मोर्चे काढले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाने सर्वपक्षीय कृती समितीचे जाहीर आभार मानले आहेत.