Breaking News

पेण खारेपाटात समुद्राच्या उधाणाने दाणादाण

100 एकर जमीन पाण्याखाली; पेरणी केलेले बियाणे वाया

पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील खारेपाटात शिर्की ग्रामपंचायत क्षेत्रातील शिर्की चाळ नंबर-1 येथील खारभूमी संरक्षक बंधार्‍यांशी निगडीत शेती व खाडीच्या मुखाशी असलेल्या उघाडीचे दरवाजे उधाणाच्या भरतीत तुटले. त्यामुळे समुद्राचे खारे पाणी परिसरातील 100 एकर पेरणी केलेल्या भातशेतीत शिरून शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत येथील शेतकर्‍यांनी पेण तहसीलदार कार्यालयात जाऊन माहिती दिली व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी केली आहे.
शेतकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार खारभूमी विभागाच्या शिर्कीचाळ नंबर 1 व 2 या परिसरात शेती असून येथे लोकवस्तीही आहे. शेती संरक्षक बंधारे व खाडीच्या मुखावर असलेल्या उघाडीचे काम गेल्या दोन महिन्यांपासून केले आहे. समुद्रात मोठी उधाण भरती आल्याने या खाडीप्रवण क्षेत्रात पाण्याची पातळी वाढली. त्यानंतर बरोबर उघाडीचे दोन दरवाजे तूटून परिसरातील 100 एकर पेरणी केलेली भातशेती शेताच्या बांधापर्यंत पाणी तुडूंब भरले. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने वेगवान प्रवाहाने शेतजमीनीत पाणी भरून पेरणी केलेले बी बियाणे नष्ट झाले आहे.
तालुका कृषी विभागाचे अधिकारी योगेश पवार याची शिर्कीचाळ येथे जाऊन पाहणी केली. दरम्यान, शिर्कीचाळ येथील शेतकर्‍यांवर आलेल्या संकटाची माहिती प्रांत अधिकारी, तहसीलदार यांनाही देण्यात आली आहे. याबाबत सखोल माहिती घेऊन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply