Breaking News

दहावीच्या परीक्षेत निकालाची टक्केवारी वाढली

बारावी परिक्षा निकालानंतर दहावी परिक्षेच्या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिले होते. गतवर्षीपेक्षा यावर्षी निकालाची टक्केवारी वाढली आहे. बर्‍याच शाळांमध्ये 100 टक्के निकाल लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी परिक्षा निकालामध्ये मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणार्‍या सर्व शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

गव्हाण विद्यालयाने निकालाची उज्ज्वल परंपरा यंदाही जपली

गव्हाण : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत जुनियर कॉलेज इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा मार्च-एप्रिल 2022चा निकाल 98.85 टक्के लागला असून उज्ज्वल निकालाची परंपरा विद्यालयाने यंदाही कायम राखल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. गुरूकुल व सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

शशिकांत विलास चौगुले हा विद्यार्थी 459 गुण (91.80 टक्के) प्राप्त करून विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला तर अन्सारी सानिया अलीम आणि घरत सिद्धी मंगल या दोन विद्यार्थिनींना 451 असे समान गुण (90.20 टक्के) प्राप्त झाल्याने त्यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. प्रणिता मोहन भोसले ही 450 गुण (90 टक्के) टक्के गुण प्राप्त करुन विद्यालयात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

एच.एस.सी.परीक्षेपाठोपाठ एस.एस.सी.परीक्षेतही विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तम यश प्राप्त केल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन विद्यालयाचे आधारस्तंभ रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत, विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे सदस्य अनंताशेठ ठाकूर व विश्वनाथ कोळी, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजयशेठ घरत, विद्यालयाच्या प्राचार्य साधनाताई डोईफोडे, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी व रवींद्र भोईर, रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर, पर्यवेक्षक दीपक भर्णुके आदींनी केले.

पनवेल तालुक्याचा निकाल 97.61 टक्के; विद्यार्थ्यांचे अभिनंदन

पनवेल : वार्ताहर

पनवेल तालुक्याचा दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर होऊन 97.61 टक्के लागल्याने पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून ज्या दहावीच्या निकालाची आतुरता लागली होती तो निकाल आज (17 जून) जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेत या निकालाची घोषणा केली. यामध्ये पनवेल तालुक्यातील 11588 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधून 6065 मुले उत्तीर्ण झाली तर 5523 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

यामध्ये तालुक्यातील जवळपास 88 विद्यालयाचा निकाल 100% लागला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सीकेटी विद्यालय 100%, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल 100%, न्यू इंग्लिश स्कूल 100%, नेरे हायस्कुल 100%, नॅशनल उर्दू हायस्कूल 100%, के.पाटील माध्यमिक विद्यालय 100%, महाराष्ट्र स्कूल 100%, मोरू नारायण म्हात्रे स्कूल 100%, बार्न्स स्कूल 100% आदी नामांकित शाळांनी आपला 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे.

उरण तालुक्याचा निकाल 97.35 टक्के; पालकवर्ग सुखावला

उरण : प्रतिनिधी

दहावीचा निकाल जाहीर झाला असून उरण तालुक्यातुन 2456 विद्यार्थ्यांपैकी 2391 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.उरण तालुक्याचा निकाल 97.35 टक्के लागला आहे.उरण तालुक्यात 28 शाळा आहेत.या 28 शाळांमधुन दहावीच्या परीक्षेत 2456 विद्यार्थी परिक्षेत बसले होते.त्यापैकी 2391 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

तालुक्याचा निकाल  97.35 टक्के लागला आहे. 28 शाळांपैकी तालुक्यातील सिटीझन हायस्कूल उरण, द्रोणागिरी हायस्कूल करंजा, पांडूरंग पाटील विद्यालय उरण, के.बी. पाटील विद्यालय पिरकोन, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय उरण, द्रोणागिरी हायस्कूल करंजा, जेएनपी विद्यालय, रोटरी इंग्रजी माध्यम, पी.एन पाटील मोठीजूई, सेंट मेरी स्कूल, सावरकर माध्यमिक विद्यालय नवीनशेवा, पुंडलिक पाटील हायस्कूल, पदाजी मुंबईकर विद्यालय, भागूबाई ठाकूर विद्यालय आणि पी.पी. खारपाटील इंग्रजी माध्यम या 17 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

परिक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 874 विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये, 946 विद्यार्थी पहिल्या ग्रेडमध्ये व  480 विद्यार्थी दुसर्‍या ग्रेड मध्ये तर 91 विद्यार्थी पास ग्रेड मध्ये पास झाले आहेत, अशी माहिती उरण गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील यांनी दिली आहे.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply