अन्यथा आंदोलन करणार -अरविंद गायकर
मुरूड : प्रतिनिधी
येथील एसटी स्थानकामधील शौचालयांची अस्वच्छता, पिण्याचे पाणी व प्रवासी शेडमधील पंख्याची गैरसोय त्वरीत दूर न झाल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा मुरूड पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी एसटीच्या रायगड विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
मुरूड एसटी स्थानक हे अस्वच्छतेचे आगार झाले आहे. येथे चांगल्या प्रवासी सोयी उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे. परंतु या एसटी स्थानकात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. पाण्याच्या टाकीजवळ तसेच शौचालय व परिसरात अस्वच्छता पसरली आहे. प्रवासी शेडमध्ये पंखे नसल्याने प्रवासी हैराण आहेत. आगरात झाडी, झुडपे वाढली असून, ती तोडण्याची तसदी आगार व्यवस्थापक घेत नाही. त्यामुळे प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत. कर्मचार्यांचीही गैरसोय होत आहे.
मुरूड एसटी स्थानकातील गैरसोयी दूर करून, प्रवाशांना तात्काळ सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा रस्त्यावर उतरून जनआंदोलन करावे लागेल, असे अरविंद गायकर यांनी या निवेदनात म्हटले आहे.अरविंद गायकर यांनी या निवेदनाच्या प्रती मुरूड तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनाही दिल्या आहेत.