खारघर : रामप्रहर वृत्त
खारघर सेक्टर 20 येथील भरवस्तीत असलेले मच्छीमार्केट नागरिकांना होणार्या त्रासानंतर सेक्टर 14 येथील राखीव भूखंडावर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जागेची सोमवारी (दि. 20) पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पाहणी केली.
गेले काही वर्षे खारघर सेक्टर 20 येथील भरवस्तीत असलेल्या मच्छीबाजाराच्या संदर्भात आजूबाजूच्या इमारतींमध्ये राहणार्या रहिवाशांकडून अनेक तक्रारी खारघर येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात येत होत्या. त्या अनुषंगाने भाजप नगरसेवक तथा पदाधिकार्यांनी सिडकोच्या अधिकार्यांना निवेदने दिली होती. येथे मोठ्या
प्रमाणात मासे व मटणाचे भाग कुजल्याने नेहमीच घाण व दुर्गंधी पसरत असते. आजूबाजूच्या रहिवाशांना तेथून इमारतीत ये-जा करताना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब अनेकदा सिडको अधिकार्यांच्या निदर्शनास आणूनही चालढकल करण्यात येत होती.
दैनंदिन मार्केट सिडकोकडून पनवेल महापालिकेला हस्तांतरित होताच भाजपतर्फे हे मार्केट इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. सभागृह नेते परेश ठाकूर आणि आयुक्त गणेश देशमुख यांनी नागरिकांना होणार्या त्रासाची दखल घेत भरवस्तीत असलेले हे मच्छीमार्केट सेक्टर 14 येथील राखीव असलेल्या भूखंडावर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भातील पाहणी दौरा सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी केला. त्यांनी पाहणी दौर्यात याबाबतच्या योग्य त्या सूचना महापालिकेचे प्रमुख अभियंते श्री. कटेकर तसेच त्यांच्या सहकार्यांना दिल्या.
या वेळी भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, महापालिका स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, रामजी बेरा, युवा नेते समीर कदम, वार्ड अध्यक्ष वासुदेव पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …