पनवेल : प्रतिनिधी
पनवेल रेल्वे स्टेशनवरून नवीन पनवेलकडे जाण्यासाठी असलेल्या पुलावरील बसवण्यात आलेल्या लाद्या उखडल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामध्ये गर्दीच्या वेळी पाय अडकून एखादा प्रवाशी पडण्याची शक्यता आहे. यामुळे या पुलाची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. मध्य रेल्वेचे पनवेल रेल्वे स्टेशन हे मोठे जंक्शन आहे. येथे क्रमांक 1 ते 4 फलाटावर लोकल गाड्या तर क्रमांक 5 ते 7 वर लांब पल्ल्याच्या गाड्या येत असतात. फलाट क्रमांक 5 ते 7 हे नवीन पनवेल बाजूला आहेत. पनवेल शहराचा मोठ्या प्रमाणात विकास हा नवीन पनवेल बाजूला झाला आहे. या बाजूला मोठ्या प्रमाणात रहिवासी वसाहती, इंजिनियरिंग व इतर महाविद्यालये असल्याने प्रवाशांची विद्यार्थ्यांची जा-ये असते. याबाजूला जाण्यासाठी सहा फूट रुंदीचा पूल आहे. लोकल थांबल्यावर अनेक जण या पुलावर जाण्यासाठी फलाटावरून धावत जात असतात. या पुलावरील जुन्या लाद्या कोरोना काळामध्ये काढून नवीन मोठ्या लाद्या बसवण्यास आल्या होत्या. नवीन पनवेलमध्ये जाण्यासाठी असलेल्या या एकमेव पुलावर बसवण्यात आलेल्या या लाद्या अनेक ठिकाणी निघाल्या असून तेथे खड्डे पडले आहेत. त्यामध्ये पाय अडकून अनेक जण पडत आहेत. याशिवाय नवीन पनवेल बाजूला या पुलावर पन्हाळी लावण्याची सल्लागार समितीच्या बैठकीत सतत मागणी होत आहे. नवीन पनवेलकडे जाणार्या एकमेव पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तेथे पावसाळ्यात पाणी पडल्याने चिकट होत आहे. त्यावरुन पाय घसरून प्रवासी पडत आहेत. त्यामुळे या पुलावर डागडुजी करण्याची मागणी होत आहे.
रेल्वे पुलावर बाहेरून गाडी आली की, गर्दी होते. त्यातच लोकल पकडण्यासाठी घाईत जाताना खड्डे न दिसल्याने पाय अडकून पडायला होते. या खड्ड्यात पाय अडकून वाकडा होत असल्याने फ्रॅक्चर होण्याचाही धोका आहे. त्यामुळे हे खड्डे भरण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.
-सुषमा महाजन, प्रवासी
रेल्वे पुलावरील खड्ड्यांमुळे पडून प्रवाशांना दुखापत होऊ शकते. म्हणून याबाबत सीनियर एडीईएन यांना पत्रे पाठवलेली आहेत. आजही त्यांना खड्ड्यांचे फोटो पाठवून पुन्हा आठवण करून दिली आहे.
-जगदीश प्रसाद मिना, स्टेशन मॅनेजर, पनवेल