Breaking News

नागोठण्यात आदिवासींच्या घरांची दुरुस्ती

नागोठणे : येथील ग्रामपंचायत हद्दीतील मिरानगर आदिवासीवाडीतील हरिश्चंद्र वाघमारे आणि भिकी पवार यांच्या घरांची अतिवृष्टीमुळे पडझड झाली होती. या प्रकाराने त्यांना घरात राहणेसुध्दा जिकरीचे झाले होते. नागोठणे ग्रामपंचायतीच्या वतीने या दोन कुटुंबांच्या घरांची दुरुस्ती करून ती मंगळवारी सायंकाळी वाघमारे आणि पवार यांच्या ताब्यात दिली. या वेळी सरपंच डॉ. धात्रक, ग्रामविकास अधिकारी दिवकर, ग्रामपंचायत सदस्या मंगी कातकरी, सदस्य मोहन नागोठणेकर, सुरेश जैन, ज्ञानेश्वर साळुंके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

कर्जत आगारात स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

कर्जत : राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे कर्जत आगारामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू आहे. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी आपले आधार कार्ड, त्याला लिंक असलेला मोबाईल तसेच मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक सोबत आणावे. स्मार्ट कार्डची फी 50 रुपये असून, नोंदणी झाल्यानंतर किमान दोन ते तीन आठवड्यांत स्मार्ट कार्ड मिळेल. अधिक माहितीसाठी सकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत 02148- 222085, 222076 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या सुविधेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन कर्जत आगार व्यवस्थापक शंकर यादव यांनी केले आहे.

माणगाव रोटरीचा आज पदग्रहण समारंभ

माणगाव : रोटरी क्लब ऑफ माणगाव व चॅरिटेबल फाऊंडेशनचा 24वा पदग्रहण समारंभ शुक्रवारी (दि. 12) सायंकाळी 6 वाजता येथील कुणबी भवन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास सहाय्यक प्रांतपाल डॉ. मदन निकम व नियोजित प्रांतपाल रश्मी कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी नूतन अध्यक्ष अ‍ॅड. मोहन मेथा, नूतन सचिव बिपीन दोशी पदग्रहण करणार आहेत. या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन क्लबचे मावळते अध्यक्ष विक्रांत सप्रे यांनी केले आहे.

कारच्या धडकेत पादचारी जखमी

पेण : मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूर चढणीच्या उतारावर मंगळवारी (दि. 9) दुपारी कारची धडक बसून पादचारी जखमी झाला. सागर देविदास (रा. पेण, मूळ रा. बिहार) असे त्या पादचार्‍याचे नाव असून, त्याला पेणमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोपरखैरणे येथून पेणकडे चाललेल्या कार (एमएच-43, बीए-1989)ची  हमरापूर चढणीच्या उतारावर पादचार्‍याला ठोकर बसून अपघात झाला. या अपघाताची नोंद  दादर सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास हवालदार एस. जी. पाटील करीत आहेत.

सारथी प्रणालीवर नोंद करण्याचे आवाहन

अलिबाग : पेण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मार्च-2017पासून सारथी 4.0 संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ज्या अनुज्ञप्तीधारकांच्या अनुज्ञप्ती हस्तलिखित स्वरूपात आहेत, त्यांनी अनुज्ञप्तीची सर्व वैध कागदपत्रे, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक इ. तपशील सादर करून सारथी 4.0 प्रणालीवर अनुज्ञप्तीची नोंद करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी केले आहे. या प्रणालीमुळे अनुज्ञप्तीधारकांना त्यांची कामे ऑनलाइन करता येणार आहेत व परिवहन विभागाच्या विविध सेवांचे शुल्क  ऑनलाइन भरता येणार आहे. तसेच ज्या अनुज्ञप्तीधारकांची अनुज्ञप्ती स्मार्ट कार्ड स्वरूपातील आहेत त्याची सारथी 4.0 या प्रणालीवर अनुज्ञप्तीची नोंद योग्य आहे की कसे हे तपासावे, त्यामध्ये काही त्रुटी असल्यास पेण येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply