अकोला ः प्रतिनिधी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी जलसंधारण मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे मंगळवारी (दि. 5) मुंबईत निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी 11.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धाबा येथील घरी त्यांचे पार्थिव बुधवारी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर दुपारी 12 वाजेनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
आमदार झाल्यानंतर बाबासाहेब धाबेकर यांनी शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा देत ते जलसंधारणमंत्री झाले. त्यांनी जलसंधारणाच्या कामांना गती दिली, तसेच सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी प्रयत्न केले. 2009मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर अकोला मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांनी त्यांचा पराभव केला होता.