Breaking News

शुक्रवारी पुन्हा भूमिपुत्र एकवटणार! ‘दिबां’च्या नावासाठी सिडको घेराव आंदोलन

प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचीही मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने शुक्रवारी (दि. 24) ‘दिबा’साहेबांच्या स्मृतिदिनी सिडकोविरोधात घेराव आंदोलन करून धडक देण्यात येणार आहे. या आंदोलनात लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि किमान 25 हजार भूमिपुत्र सहभागी होणार आहेत.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे या मागणीसाठी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांतील भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांनी मागील वर्षी 10 जूनला भव्य साखळी आंदोलन, 24 जूनला ऐतिहासिक सिडको घेराव आंदोलन, 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी मशाल मोर्चा, 17 मार्चला भूमिपुत्र परिषद, सिडको वर्धापन दिनी काळा दिन आंदोलन, 24 जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन अशी भव्य आंदोलने केली, मात्र सिडको आणि महाराष्ट्र सरकार प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आली आहे. त्यामुळे भूमिपुत्रांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
मागील 24 जूनच्या सिडको घेराव आंदोलनात सिडकोकडे विमानतळाच्या पूर्वीचा नामकरणाचा ठराव विखंडित करून लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा ठराव करावा, असे निवेदन दिले होते, मात्र वर्ष उलटले तरी त्यावर सिडको अथवा शासनाने कोणताही निर्णय केलेला नाही. सुदैवाने भूमिपुत्रांच्या एकीमुळे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव अद्याप मंत्रिमंडळाच्या बैठकीत अथवा विधानसभेत आणला गेला नाही.
सिडको आणि त्या अनुषंगाने नवी मुंबई वसविताना राज्य सरकारने रायगड जिल्ह्यांतील पनवेल, उरण आणि ठाणे जिल्ह्यामधील बेलापूर पट्ट्यातील 95 गावांतील 65 हजार शेतकर्‍यांच्या कुटुंबाच्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावाने संपादित केल्या. त्यावर सिडकोने हजारो कोटी कमविले आहेत, मात्र 100 टक्के भूमिहीन केलेल्या प्रकल्पग्रस्तांना काही द्यायचे झाले की सिडको उदासीन दिसते. म्हणूनच प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या अनेक मागण्या आजही प्रलंबित असल्याचे दिसत आहे.
प्रकल्पग्रस्तांचे शिक्षण, नोकरी, साडेबारा टक्के भूखंड, गरजेपोटी बांधलेली बांधकामे, गावठाण विस्तार, विमानतळबाधित 27 गावांच्या समस्या, नैना प्रकल्पाच्या समस्या असे अनेक प्रश्न सिडकोच्या उदासीन वृत्तीमुळे प्रलंबित आहेत. यापूर्वी सिडकोत अनेक ठराव होऊनही प्रकल्पग्रस्तांचे गरजेपोटीची बांधकामे नियमित केली जात नाहीत. यासाठी नुकताच केलेल्या शासन निर्णयात 250 मीटरचे निकष, भाडेपट्टा अशा अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी आहेत.
सिडकोच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी व मागण्या मान्य करून घेण्यासाठी सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनावर घेराव आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात भूमिपुत्रांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या आहेत मागण्या…
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाबाबत 28 एप्रिल 2021 रोजी सिडकोने केलेला ठराव विखंडीत करून प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या भावना लक्षात घेऊन लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा नवीन ठराव सिडकोने करावा, जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना विनाविलंब साडेबारा टक्के भूखंडाचे वाटप करावे, 25 फेब्रुवारी 2022 रोजी सरकारने घेतलेल्या नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांबाबतच्या शासन निर्णयात प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन बदल करण्यात यावा, विमानतळबाधित 27 गावांच्या समस्या त्वरेने सोडवाव्यात,  प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न बैठका घेऊन तातडीने सोडविले जावेत.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply