पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि पनवेल महापालिकेचे नगरसेवक यांच्या सातत्यापुर्ण प्रयत्नांमुळे व केलेल्या पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे महापालिका क्षेत्रात होत आहेत. त्याअनुषंगाने खारघर सेक्टर 10 प्लॉट नंबर 230 मध्ये खेळाच्या मैदानाचे तसेच उद्यानातील कामांचा शुभारंभ बुधवारी (दि. 22) झाला. सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतीमध्ये सिडकोने उद्याने उभारली मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची दुर्दशा झाली. त्यामुळे या उद्यानांमध्ये येणार्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. सध्यस्थितीत सिडकोमार्फत महापालिकेकडे उद्याने हस्तांतरीत करण्यात आली आहेत. त्यानुसार या उद्यानांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करण्याकरीता भाजपच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी पाठपुरावा केला होता. त्याअंतर्गत बुधवारी खारघर सेक्टर 10 प्लॉट नंबर 230 येथील खेळाचे मैदान व उद्यानातील कामांचे भूमिपूजन झाले. या वेळी पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती अॅड. नरेश ठाकूर, युवा नेते समीर कदम, राम सोनावणे, रमेश रामण, दिलीप पांचाळ, जयकुमार पांडे, कैलास नामदेव इंगळे, संजय सायगावकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.