मुरूड : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात वन्यजीवांची शिकार करण्यासाठी आलेल्या सात जणांना पकडण्यात आले आहे. या सर्वांना मुरूड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुरूडपासून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या फणसाड अभयारण्यात विविध वन्यजीव आणि वृक्षसंपदा आहे. येथे रात्रीच्या समयी वन्यजीवांची शिकार करण्यासाठी 24 जून रोजी सात जण आले होते. यामध्ये मंगेश विष्णू वाघमारे (वय 25), सोमनाथ गजानन वाघमारे (23, दोघेही रा. बेलीवाडी) मच्छिंद्र दशरथ वाघमारे (26, सुमरादेवी), दीपक मनोज पाटील (18), प्रथमेश प्रकाश ठाकूर (21, दोघेही रा. शिरगाव), चेतन भास्कर खानावकर (25) व प्रज्वल हेमंत रोटकर (22, दोघेही रा. साळाव) यांचा समावेश होता. शिकारीसाठी आलेल्या या लोकांना टेहळणी करताना फणसाड अभयारण्य प्रशासनातील कर्मचारीवृंदाने पकडले. त्यांच्याकडून दोन ठासणीच्या बंदुका, जिवंत दारुगोळा, तीन मोटरसायकली, तीन बॅटर्या, पाच मोबाइल ताब्यात घेण्यात आले आहेत.
ठाणे विभाग उपवनसंरक्षक सरोज गवस व सहाय्यक वनसंरक्षक नंदकुमार कुप्ते यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार काळभोर व कर्मचारी यांनी ही कारवाई केली. अभयारण्य प्रशासनाने या सातही जणांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972चे कलम 9, 27, 31, 39 (1), 50, 51 (1) व 52 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …