Breaking News

पनवेल महापालिकेचा 3991 कोटी 99 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर

पनवेल ः प्रतिनिधी
महिला सशक्तीकरणाला प्राधान्य देणार्‍या 3991 कोटी 99 लाख रुपयांच्या सन 2024-25च्या पनवेल महापालिकेच्या शिलकी अर्थसंकल्पाला महापालिका आयुक्त व प्रशासक गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि.23) मंजुरी दिली. 32 लाख शिलकीचा कोणतीही कर किंवा दरवाढ व शुल्कवाढ नसलेला हा अर्थसंकल्प असून ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्राबरोबरच एनएमएमटीच्या बसमध्ये आता शंभर टक्के सवलत मिळणार आहे.
पनवेल महापालिकेचे सन 2024-25चा अर्थसंकल्प मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे यांनी प्रशासकीय स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांनी तो मंजूर केल्याचे जाहीर केले. या अर्थसंकल्पामध्ये महापालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधांबरोबरच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे.
या वेळी अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त सचिन पवार, गणेश शेटे, कैलास गावडे, डॉ.वैभव विधाते, सहाय्यक संचालक नगररचना अधिकारी ज्योती कवाडे, मुख्य अभियंता संजय जगताप, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे, उपमुख्य लेखापरीक्षक संदीप खुरपे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, उपअभियंता विलास चव्हाण, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, सचिव तिलकराज खापर्डे उपस्थित होते.
यानंतर आयुक्तांनी सांगितले की, मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांना महत्त्व देण्यात आले होते. त्यामध्ये असलेली 15 आरोग्य केंद्र, कळंबोली येथील 75 खाटांच्या रुग्णालयासह बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. यात सगळ्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नोकरदार माणूस रात्री कामावरून येतो. त्यांच्या सोयीसाठी रात्री उशिरापर्यंत दवाखाने सुरू ठेवण्यात आले. त्याचा फायदा अनेकांना झाला. नवी मुंबईला आदर्श मानून काम करीत आहोत. त्यामुळे याचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्याकडे आता 1230 कोटीच्या ठेवी जमा आहेत. आम्ही हा अर्थसंकल्प महिला शक्तीला सक्षम करण्यासाठी बनवला आहे. त्यांच्यासाठी खास योजना यामध्ये आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीही खास तरतुदी केल्या आहेत. महापालिका हद्दीतील राष्ट्रीय, व राज्य पातळीवरील खेळाडूंना आर्थिक मदत केली जाणार आहे. आजचा अर्थसंकल्प हा 32 लाख रुपयांचा शिलकीचा आहे. त्यामध्ये एकूण जमा 3991 कोटी 99 लाख; तर एकूण खर्च 3991 कोटी 67 लाख आहे. तो महिलांसाठी समर्पित करतो.
आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते अशा गुणवत्तापूर्ण पायाभूत सोयीसुविधांबरोबरच शहर सुशोभीकरण, झोपडपट्टी पुनर्विकास अशा महत्त्वाच्या गोष्टीचांही या अंदाजपत्रकात अंतर्भूत करण्यात आल्या असून नागरिकांच्या गरजा ओळखून विकासामुख आणि लोकाभिमुख कोणतीही दरवाढ नसलेला असा पालिकेचा अर्थसंकल्पात तयार करण्यात आला आहे.

आयुक्तांनी मानले सर्वांचे आभार
या वेळी आयुक्त व प्रशासक गणेश देशमुख यांनी केंद्र सरकारने अमृत योजना दिली, त्याबद्दल त्यांचे व राज्य शासनाने त्यांचा वाटा उचलल्याबद्दल त्यांचेही आभार मानले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत, मंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे यांचे आभार मानले. जीएसटी अनुदान मिळण्यात फार मोठे योगदान आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी दिल्याने त्यांचे तसेच माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पत्रकार, नागरिक यांचेही आभार मानले.

Check Also

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी …

Leave a Reply