Breaking News

खारघरमधील आंदोलनप्रकरणी शिवसेना पदाधिकार्‍यांंवर गुन्हे दाखल

खारघर : प्रतिनिधी
राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी आपल्या हद्दीत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत, मात्र त्यानंतरदेखील शिवसेनेच्या रायगड जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी बंडखोर शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांचे खारघर येथे पुतळे जाळून आंदोलन केले. त्यामुळे खारघर पोलिसांनी या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीश घरत यांच्या वतीने शनिवारी  (दि. 25) खारघर बेलपाडा येथील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस शिवसेना नेते अनंत गीते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार मनोहर भोईर, शिरीष घरत, बबन पाटील आदी उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर कार्यालयाच्या बाहेर आलेल्या काही नेते व पदाधिकार्‍यांनी मंत्री एकनाथ शिंदे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुतळ्यांचे दहन करून निषेध व्यक्त केला.
खारघर पोलिसांनी या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिरीष घरत व त्यांच्यासोबत बबन पाटील, मनोहर भोईर, गुरूनाथ पाटील, शंकर पाटील, प्रकाश गायकवाड, परेश पाटील, यतीन देशमुख, अनिल पाटील, दीपक घरत यांच्यासह 40 ते 50 पदाधिकार्‍यांवर मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Check Also

पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी

सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे …

Leave a Reply