खालापूर : प्रतिनिधी
मद्यप्राशन करून खालापूर तालुक्यातील चौक येथील मोरबे धरणात उतरलेल्या ग्रुपमधील एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वैभव रामचंद्र गवांदे (वय 22, रा. साकिनाका, मुंबई) असे या मयत तरुणाचे नाव असून त्याचा मृतदेह सोमवारी (दि. 27) पाण्याबाहेर काढण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील साकिनाका-कुर्ला येथील आठ युवक खालापुरातील चौक येथे असणार्या मोरबे धरणावर रविवारी पिकनिकसाठी आले होते. धरणाच्या किनारी या तरुणांनी मद्यप्राशन केले आणि ते पाण्यात पोहण्यासाठी उतरले. धरणाच्या पाण्याची पातळी खाली गेली असल्याने हे तरुण किनार्यापासून सुमारे एक किमी अंतरावर पोहत गेले, मात्र या वेळी खोल पाण्याचा अंदाज न आल्याने वैभव गवांदे हा पाण्यात बुडाला आणि खाली चिखल व कपारीत अडकून पडला.
वैभव बाहेर न आल्याने घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी थेट मुंबई गाठली. यामध्ये वैभवचा भाऊही होता, परंतु त्याला याची खंत जाणवू लागल्याने झालेली हकिकत त्याने आपल्या कुटुंबाला सांगितली. त्यानंतर नातेवाइकांनी कुर्ला पोलीस ठाण्यात याबाबत खबर दिली. तिथून ही घटना कळताच खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत चौक दूरक्षेत्रचे सहाय्यक निरीक्षक सूर्यवंशी यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी असलेल्या ग्रुपचे अभिजित घरत व त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने वैभवचा मृतदेह सोमवारी सकाळी पाण्यातून बाहेर काढला.
रायगड जिल्ह्यात धरणक्षेत्र, धबधबे अशा पावसाळी पर्यटनस्थळांवर जाण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. असे असूनही काही अतिउत्साही पर्यटक आदेशाचे उल्लंघन करीत जीव धोक्यात घालत असल्याचे समोर येत आहे. मागील आठवड्यात 20 जून रोजी खालापुरातील कलोते धरणात बुडून कर्नाटक कारवार येथील आकाश नाईक (वय 26) हा तरुण बुडाला होता, तर मागील वर्षी खालापूर तालुक्यातील विविध धरण व परिसरात एकूण पाच जण बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …