विशेष अधिवेशनात पहिल्याच दिवशी सत्ताधारी-विरोधकांमध्ये लढत
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला रविवार (दि. 3)पासून प्रारंभ होत आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत असून भाजप युतीचे अॅड. राहुल नार्वेकर आणि महाविकास आघाडीचे राजन साळवी यांच्यात लढत आहे.
नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिक्त झालेे. तेव्हापासून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळच अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत होते. आता महाविकास आघाडी सरकार पडून नवे सरकार आल्यानंतर 3 जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून कुलाब्याचे आमदार अॅड. राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी देण्यात आली आहे, तर त्यांच्याविरुद्ध शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी अर्ज दाखल केला आहे. भाजप मित्रपक्ष आणि दुसरीकडे महाविकास आघाडी असे उभयांच्या आमदारांचे संख्याबळ पाहता अॅड. नार्वेकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे.