चित्रपती व्ही. शांताराम 125वी जन्मशताब्दी
चित्रपटाचे जग आपण अनुभवू तसे, काही वास्तूंमध्ये प्रवेश करताच काही वेगळेपण जाणवते. त्या वास्तूच्या उभारणीतील महनीय व्यक्तीचे आजही तेथे अस्तित्व आहे असे जाणवते…
परळ येथील राजकमल कलामंदिरच्या वास्तूत अनेक वर्ष मी जातो आहे, यापुढेही जाणार आहे, पण जस जसे या स्टुडिओचे प्रवेशव्दार जवळजवळ येत जाते. चित्रपती व्ही.शांताराम यांच्या अलौकिक कर्तृत्वाची जणू छाया तेथे जाणवते. आजही ते या स्टुडिओत कुठे तरी आसपास आहेत, अथवा सेटवर एखाद्या प्रसंगाचे दिग्दर्शन करीत आहेत, अथवा या स्टुडिओतील कार्यालयात आहेत, स्टुडिओत फेरफटका मारत मिनी थिएटरपासून लायब्ररीपर्यंत सगळी कामे वेळेवर नि व्यवस्थित सुरू आहेत ना हे ते पाहताहेत असे वाटते…
चित्रपती व्ही. शांताराम यांची भारतीय चित्रपटसृष्टीतील वाटचाल दीर्घकालीन आणि अतिशय उल्लेखनीय अशीच. 18 ऩोव्हेबर रोजी त्यांचे 125वे जन्मशताब्दी वर्ष सुरु झालं आहे, त्यानिमित्त हा विशेष फोकस. व्ही. शांताराम हे अगदी मूकपटाच्या काळापासून ते या माध्यम व व्यवसायात सक्रिय. 1925 सालच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी, कोल्हापूर निर्मित व बाबूराव पेंटर दिग्दर्शित सावकारी पाश या चित्रपटात व्ही.शांताराम यांनी हरबा ही व्यक्तीरेखा साकारली.
चित्रपट माध्यम व व्यवसायाच्या बदलत्या प्रवासाचे ते एक साक्षीदार आहेत. त्यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांत, 92 चित्रपट निर्माण केले आणि 55 चित्रपट दिग्दर्शित केले तसेच तेच आपल्या चित्रपटाचे संकलक असत, त्यांना ते गरजेचे वाटे. पंचवीस चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या.
व्ही.शांताराम हे चित्रपट माध्यम व व्यवसायाची अतिशय उत्तम जाण असलेले दिग्दर्शक. मनस्वी, जिद्दी, करारी आणि विलक्षण खंबीर. कामाला जणू वाघ. अखेरपर्यंत त्यांनी स्वप्न पाहिली ती भव्य निर्मितीची आणि त्यांना भारत सरकारच्या वतीने दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1 जून 1929 रोजी पुण्यात प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली. त्यात केशवराव धायबर, विष्णुपंत दामले, साहेबमामा फत्तेलाल आणि व्ही.शांताराम असे चार भागीदार होते. प्रभात फिल्म कंपनीत असताना व्ही.शांताराम यांनी सुरुवातीस पौराणिक चित्रपटही बनवले, पण 1937 सालच्या ‘कुंकू’पासून सामाजिक आशयाकडे ते वळले.
1942 साली व्ही.शांताराम यांनी प्रभातमधून बाहेर पडून राजकमल कलामंदिर स्टुडिओ उभारला, राजकमलची तुतारी फुंकली आणि आपली चित्रपट निर्मिती व दिग्दर्शन यांची यशस्वी वाटचाल सुरु ठेवली. राजकमल कलामंदिरची स्थापना केल्यावर मुंबईत आपला स्टुडिओ हवा म्हणून त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी जे.बी.एच. वाडिया यांजकडून सेन्ट्रल स्टुडिओ विकत घेतला. 1942 साली अडीच लाख रुपये ही प्रचंड मोठी रक्कम होती आणि त्याचा राजकमल कलामंदिर स्टुडिओ उभारला.
राजकमल कलामंदिरचा पहिला चित्रपट शकुंतला गोष्ट, नृत्य, रंग व संगीत यांना आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटात त्यांनी कायमच महत्त्व दिले. कृष्णधवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातही त्यांचा आपला एक रंग असे आणि रंगीत चित्रपटात तर त्याचा प्रभावी वापर असे. त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटातील श्रेयनामावलीत (दो आँखे बारह हाथ या चित्रपटाची श्रेयनामावली आवर्जून पहा… त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील श्रेयनामावलीत दिग्दर्शक दिसतो), आपल्या चित्रपटाची पोस्टर्स, त्याचे प्रदर्शन आणि मेन थिएटरमधील फर्स्ट शोचा पब्लिक रिपोर्ट यांना ते फारच महत्त्व देत. आपल्या शांताराम या चरित्रात त्यांनी याहीबाबतीत बरेच काही सांगितलंय (प्रेक्षक प्रतिसाद जाणून घेण्याबाबतची त्यांची असोशी नवीन पिढीतील सिनेमावाल्यांनीही शिकावी अशी आहे.) आपला चित्रपट कोणत्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे याबाबत ते जागरूक असत. त्याचे मेन थिएटर लिबर्टी असावे की ऑपेरा हाऊस की आणखी कोणते याचा ते बारकाईने अभ्यास करत आणि पहिल्याच दिवशी ते स्वतःच चित्रपटगृहावर जात आणि एखादा प्रसंग कंटाळवाणा वाटल्यास चक्क लगेचच कात्री लावत. जलबिन मछली नृत्यबिन बिजली या आपल्या चित्रपटाचा क्लायमॅक्स आवडला नाही म्हणून त्यांनी तो बदलला आणि रिशूटींग केले, तर तुफान और दिया या चित्रपटातील राजेंद्रकुमारच्या भूमिकेला बरीचशी काट मारली.
त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटातील गीत संगीत व नृत्य हा एक स्वतंत्र मोठा विषय. मग ते गाणे नैन से नैन नाही मिला असो अथवा ये मालिक तेरे बंधे हम असो. आपल्या चित्रपटातील नृत्याची कलाकारांनी भरपूर तालीम (रिहर्सल) करावी याबाबत त्यांचा विलक्षण आग्रह. झनक झनक पायल बाजे या चित्रपटातील गीत संगीत व नृत्यासाठी गोपीकृष्ण व संध्या यांना महिनोन् महिने तालमी करायला लावल्या. सेटवर वेळेवर यायला हवे ही त्यांची शिस्त. पटकथा व संकलन या गोष्टीवर त्यांचा विलक्षण कटाक्ष असे. या माध्यम व व्यवसायाशी ते एकरूप एकनिष्ठ झालेले असे व्यक्तीमत्व.
मराठीतील पहिला बोलपट अयोध्येचा राजा (मुंबईत प्रदर्शित 6 फेब्रुवारी 1932. गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला). या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीची असून दिग्दर्शन व्ही.शांताराम यांचे आहे. म्हणजेच मूकपटाकडून बोलपटाकडे प्रवास करताना पहिला मराठी बोलपट व्ही.शांताराम यांचा आहे.
प्रभात फिल्म कंपनी याच निर्मिती संस्थेच्या व्ही.शांताराम यांचे संकलन व दिग्दर्शन असलेल्या सैरंध्री (1933) या चित्रपटाचीही काही वैशिष्ट्य आहेत. या चित्रपटाव्दारे भारतीय चित्रपटांच्या ध्वनिमुद्रिका सुरू झाल्या. या चित्रपटाच्या रसायन व आवृत्तीचे काम जर्मनी येथील उफा स्टुडिओत झाले आणि ध्वनिमुद्रिकाही तेथेच काढण्यात आल्या. अशा ध्वनिमुद्रिका बनवण्याची पहिली कल्पना शांतारामबापूंना सुचली. ते काळाच्या खूपच पुढचा विचार करत हेच यातून अधोरेखित होत आहे. सैरंध्री चित्रपट मराठीबरोबरच हिंदीतही निर्माण करण्यात आला होता.
व्ही.शांताराम दिग्दर्शित व संकलित माणूस (1939) या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात सर्वप्रथम आपल्या देशातील चित्रपटातील पहिले बहुभाषिक गाणे आहे. मराठीबरोबरच उर्दू, गुजराती, पंजाबी, बंगाली व तमिळ भाषेतील एकेक कडवे होते. गाण्याचे बोल होते, प्रेमी प्रेम नगर को आये… लुटूया प्रेमाचा बाजार. हे गीत अनंत काणेकर यांचे तर संगीत मास्टर कृष्णराव यांचे.
व्ही.शांताराम दिग्दर्शित ’अमृत मंथन’ (1934) या चित्रपटात आपल्याकडील चित्रपटात पहिला क्लोजअप पहायला मिळाला. झनक झनक पायल बाजे हा आपल्या देशातील पहिला टेक्निकलर चित्रपट. म्हैसूर (कर्नाटक) येथील वृंदावन गार्डन येथे या चित्रपटातील काही दृश्य चित्रीत केली. संगीतकार वसंत देसाई यांनी या चित्रपटासाठी फक्त भारतीय वाद्यांचाच उपयोग केला. या चित्रपटातील संध्याजींचे दीप नृत्य शास्त्रीय संगीतावर आधारित आहे. याच चित्रपटाच्या निर्मितीबाबत शिवाजी पार्क येथे व्ही.शांताराम यांच्या सत्काराचे आयोजन केले असता त्यात त्यांना चित्रपती व्ही.शांताराम असे गौरवण्यात आले आणि तीच त्यांची विशेष ओळख बनली. त्यांनी दिग्दर्शिलेला अमर भूपाळी बंगाली भाषेत डब करण्यात आला तसेच चैन्नईतही (तेव्हाचे मद्रास) लोकप्रिय ठरला.
व्ही.शांताराम दिग्दर्शित शकुंतला या चित्रपटाने 104 आठवडे चालण्याचा विक्रम केला. त्यांच्या चौफेर व वैशिष्ट्यपूर्ण वाटचालीत महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ’पिंजरा’ (1972). पुणे शहरात प्रभात थिएटरमध्ये हा चित्रपट 31 मार्च 1972 रोजी प्रदर्शित झाला, तर मुंबईत हा चित्रपट सेन्ट्रल, प्लाझा आणि भारतमाता येथे 14 एप्रिल 1972 रोजी प्रदर्शित झाला आणि मग त्याची संपूर्ण महाराष्ट्रभर यशस्वी घोडदौड सुरू झाली आणि राज्यात नऊ शहरात खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले.
रसिकांना या पिंजरा मध्ये अडकणे आवडलं. आता ’पिंजरा’ म्हणताक्षणीच रसिकांच्या एका पिढीला त्याची गोष्ट, गाणी आणि अगदी थीमनुसार पोस्टर असे सगळे आठवले असेल. त्या काळात हा चित्रपट म्हणजे प्रचंड मोठी क्रेझ निर्माण झाली होती. या ’पिंजरा’चे मध्यवर्ती कथासूत्र म्हणजे मराठी चित्रपटात कथा हीच स्टार असते असे म्हणतात त्याचाच प्रत्यय देणारे. याचे कथाबीज हॉलीवूडचा चित्रपट ’ब्लू एंजल’ यावर आधारित आहे असे म्हटले गेले तरी त्याची महाराष्ट्रीय संस्कृती आणि मराठी चित्रपटाची वैशिष्ट्ये यानुसार ती गोष्ट सजवण्यात अथवा रंगवण्यात आली आहे हे विशेषच कौतुकाचे आहे आणि हेच या चित्रपटाचे सर्वात मोठे यश आहे. व्ही. शांताराम, अनंत माने आणि शंकर पाटील या तिघांनी मिळून या चित्रपटाच्या पटकथा आणि संवादवर भरपूर मेहनत घेतली आणि तो शंभर टक्के मराठी चित्रपट ठरला.
तोपर्यंत मराठी चित्रपटात तमाशा हा केंद्रस्थानी असलेले अनेक चित्रपट आले, पण हा अगदी वेगळा असा ठरला. याचे कारण म्हणजे व्ही. शांताराम यांची प्रभावी आणि कल्पक अशी हाताळणी. विशेषतः प्रतिकात्मक दृश्य हे आपले वैशिष्ट्य या चित्रपटात त्यांनी खुबीने वापरले. या चित्रपटाचे छायाचित्रण, संगीत आणि अभिनय याला राजकमल कलामंदिर टच होता. या चित्रपट निर्मिती संस्थेची प्रतिष्ठा या चित्रपटात पहायला मिळाली. तमाशाच्या फडाचे एका वेगळ्या कोनातून या चित्रपटात दर्शन घडते. म्हणून तर त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार ’पिंजरा’ला प्राप्त झाला.
व्ही. शांताराम हे आपल्या प्रत्येक चित्रपटातील गाणी कमालीची चांगली असावीत यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील असत. त्यांच्या दिग्दर्शनातील ’दो आँखें बारह हाथ ’, ’नवरंग ’, ’गीत गाया पत्थरोने’, ’डॉ. कोटणीस की अमर कहानी, सेहरा या चित्रपटातील गाणी त्याचा प्रत्यय देतात. आपल्या एका चित्रपटात तब्बल दहा बारा गाणी असणे त्यांना फारसे गैर वाटत नसे. किंबहुना गाणी हे आपल्या भारतीय चित्रपटाचे जगावेगळं वैशिष्ट्य आहे यावर त्यांचा विश्वास असे. ’पिंजरा’मध्येही तब्बल दहा गाणी आहेत, एकेका गाण्याचे शब्द, मुखडा आणि चाल यासाठी व्ही. शांताराम प्रचंड आग्रही राहिले. या चित्रपटाची गीते जगदीश खेबूडकर यांची असून संगीत राम कदम यांचे आहे. खरंतर ’पिंजरा’ पडद्यावर येईपर्यंत अनेक मराठी चित्रपटांसाठी ते एकत्र आले होते, एकमेकांच्या कामाची पद्धत माहीत होती. तरीही त्यांना या चित्रपटासाठी विशेष मेहनत घ्यावी लागली. व्ही. शांताराम हे कायमच आपल्या चित्रपटाच्या थीमनुसार श्रेयनामावली असावी यासाठी आग्रही असत. महत्त्वाचे म्हणजे यातील कोणतेही गाणे ऐकताना चित्रपटातील त्याचे स्थान डोळ्यासमोर येते हे विशेषच आहे. पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांना या चित्रपटाने दिलेल्या संधीचे त्यांनी सोने केले तसेच लता मंगेशकर, सुधीर फडके, महेंद्र कपूर, जयवंत कुलकर्णी, वाघमारे यांनीही ही गाणी गायलीत. शहरापासून ग्रामीण भागात दूरवर तळागाळापर्यंत ही गाणी आणि या गाण्यांसह चित्रपट पोहचला. या चित्रपटाचे कला दिग्दर्शक बाबूराव जाधव आहेत, तर छायाचित्रण शिवाजी सावंत यांचे आहे. प्रत्येक बाबतीत व्ही. शांताराम यांचा टच दिसतोय.
विशेष म्हणजे डॉ. श्रीराम लागू यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. तोपर्यंत ते मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. ’नटसम्राट’ या नाटकाचे प्रयोग अधिकाधिक उंचीवर नेत होते, पण व्ही. शांताराम यांनी त्यांना ’पिंजरा’तील मास्तर साकारातची खास विनंती केली. लागू यांनी व्ही. शांताराम यांचे अनेक चित्रपट पाहिले असल्याने त्यांनी होकार दिला आणि विशेष म्हणजे कोल्हापुरात शालिनी स्टुडिओत या चित्रपटाचे शूटिंग असताना आपले दृश्य चित्रीत झाले तरी ते व्ही. शांताराम यांची दिग्दर्शन कार्यशैली पाहत सेटवरच बसत. ते बरेच काही जाणून घेत. त्यात त्यांची नवीन गोष्टी शिकण्याची प्रवृत्ती दिसते आणि व्ही शांताराम यांचे प्रत्यक्षात सेटवर दिग्दर्शन अनुभवणे ही तर मोठीच सोनेरी संधी.
पूर्वीच्या अनेक कलाकृती अजरामर झाल्या त्यात हा घटक खूपच महत्त्वाचा! विशेष म्हणजे मुंबई महाराष्ट्रात दूरदर्शनचे आगमन होण्याच्या काही महिने अगोदरचा हा काळ होता आणि तेव्हा चित्रपटात गाणी पाहणे याशिवाय रेडिओ, लाऊडस्पीकर, वाद्यवृंद, इराणी हॉटेलमधील जुक्स बॉक्स अशी काही मोजकीच माध्यमे गाणी ऐकण्यासाठी असत, पण गाणीच अशी श्रवणीय की अशी मोजकीच माध्यमे असूनही ती लोकप्रिय झाली, ओठांवर आली आणि केवळ गाणी पाहण्यासाठी अनेक रसिकांनी ’पिंजरा’ पुन्हा पुन्हा थिएटरमध्ये जाऊन पाहिला.
याशिवाय या चित्रपटात निळू फुले, वत्सला देशमुख, माणिकराज, गोविंद कुलकर्णी, कृष्णकांत दळवी, सरला येवलेकर, आबू, शोभा, भालचंद्र कुलकर्णी, बर्चीबहाद्दर इत्यादींच्याही भूमिका आहेत. या छोट्या छोट्या व्यक्तिरेखाही लक्षात राहतात.
या चित्रपटाच्या खणखणीत यशाने आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली. या चित्रपटापूर्वी मराठीत 1965 साली व्ही. शांताराम यांनीच मराठीतील पहिला रंगीत चित्रपट ’इये मराठीचिये नगरी’ निर्माण केला, पण तरीही मराठीत कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपटाचाच काळ सुरू राहिला. त्यानंतर व्ही. शांताराम यांनी ’पिंजरा’ पुन्हा रंगीत चित्रपट निर्माण केला, तो सुपर हिट झाल्यावर हळूहळू का होईना पण मराठीत रंगीत चित्रपटाचे युग सुरू झाले. तरीही आठ दहा वर्षे मराठीत काही चित्रपट ब्लॅक अॅण्ड व्हाईट तर रंगीत येत राहिले, पण ’पिंजरा’च्या यशाने मराठी चित्रपटसृष्टीत रंगाचे महत्त्व पटू लागले सिद्ध झाले. हेही चित्रपती व्ही.शांताराम यांचे मराठी चित्रपटसृष्टीला मोठे देणं आहे.
…मराठी ‘पिंजरा’ची व्ही. शांताराम यांनीच 1973 साली हिंदीत पिंजडा या नावाने केलेली रिमेक मात्र रसिकांनी नाकारली. मुंबईत मेन थिएटर मराठा मंदिर चित्रपटगृहातून हा चित्रपट अवघ्या काही आठवड्यातून उतरला, प्लाझा चित्रपटगृहात मात्र काही काळ मुक्काम केला.
चित्रपती व्ही.शांताराम, अभिनय कोहिनूर दिलीपकुमार व स्वरयात्रा लता मंगेशकर एकत्र येणे हासुध्दा असाच एक महत्त्वपूर्ण योग. खर तर कोणत्याही चित्रपटासाठी हे तिघेही एकत्र येण्याचा योग कधीच आला नाही. लतादिदी व दिलीपकुमार हे मानलेले भाऊ व बहीण आहेत. लतादिदी दिलीपकुमारना राखी बांधत. 1996 साली अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला रंगलेल्या लता मंगेशकर यांच्या भव्य संगीत कार्यक्रमास दिलीपकुमारची खास उपस्थिती होती. व्ही.शांताराम यांच्या राजकमल कलामंदिर या निर्मिती संस्थेच्या कोणत्याच चित्रपटात दिलीपकुमारने भूमिका साकारली नाही, मात्र दिलीपकुमारची भूमिका असणार्या यश चोप्रा दिग्दर्शित ’मशाल’ इत्यादी अनेक चित्रपटांचे राजकमलमध्ये चित्रीकरण होताना दिलीपकुमार व व्ही.शांताराम या दोन दिग्गजांची या स्टुडिओतील व्ही.शांताराम यांच्या कार्यालयात भेट होऊन गप्पा रंगत, तर लता मंगेशकर यांनी व्ही.शांताराम दिग्दर्शित ’झनक झनक पायल बाजे’ (1955), ’दो आँखे बारह हाथ’ (1957), ’सेहरा’ (1963), ‘पिंजरा’ (1972) इत्यादी अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे तसेच लता मंगेशकर यांनी निर्मिती असलेला व गुलजार दिग्दर्शित ’लेकिन’ या चित्रपटाचा याच राजकमल कलामंदिरमध्ये दिदींच्या वाढदिवसानिमित्त 28 सप्टेंबर 1987 रोजी अतिशय थाटात मुहूर्त झाला. आजही या मुहूर्ताचा भावनिक क्षण आठवतोय. विनोद खन्ना, डिंपल खन्ना व अमजद खान यांच्या प्रमुख भूमिका असणार्या लताजींच्या या चित्रपटाच्या मुहूर्ताला क्रिकेटर सुनील गावसकर याची खास उपस्थिती होती.
या तिघांच्या भिन्न स्वरूपातील भेटीगाठी वा आठवणी यांचा हा ट्रेलर… ‘दो आँखे बारह हाथ’मधील जेलरची भूमिका दिलीपकुमारनेच करावी असा प्रयत्न पूर्ण होऊ न शकल्याने व्ही.शांताराम यांनीच ती साकारलीय असाही एक किस्सा प्रसिद्ध आहे, पण हे तिघेही दिग्गज एकत्र येण्याचा सुयोग एकदा मात्र आला. या तिघांनाही चित्रपट या माध्यम व व्यवसायाबद्दल कायमच विशेष आस्था असणे यात आश्चर्य नाही. तिघांकडेही या क्षेत्रातील दीर्घानुभव. या प्रत्येकाचे समाजात मानाचे स्थान व त्यांनीही समाजाला बरेच काही दिलेय. या तिघांचेही पडद्यापलिकडे जाऊन प्रेक्षकांशी भावनिक नाते जुळलंय. विविध स्तरावर त्याचा स्वीकार करता येईल. म्हणूनच तर हे तिघेही एकत्र येण्याचा हा क्षण विशेष मोलाचा….अरे हो, ज्या निमित्त हे तिघे एकत्र येण्याचा योग जुळून आला तो चित्रपटसृष्टीचा बंद अखेर 10 नोव्हेंबर रोजी मिटला, पण एक चांगली आठवण देणारा ठरला.
चित्रपती व्ही.शांताराम यांच्या प्रगती पुस्तकात अशा अनेक अगणित सकारात्मक गोष्टी आहेत. त्यातील काहींवर हा फोकस्ड. आजही राजकमल कलामंदिर स्टुडिओत पाऊल टाकताच व्ही. शांताराम (जन्म 18 नोव्हेंबर 1901. मृत्यू 30 ऑक्टोबर 1990) यांचे अस्तित्व नक्कीच जाणवते. अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या (त्यातील अनेक मानाचे पुरस्कार राजकमलमध्ये अतिशय व्यवस्थित मांडण्यात आले आहेत) या व्यक्तिमत्वाचे मोठेपण चित्रपटाच्या विशाल पडद्यासारखेच उत्तुंग आहे…
चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांचे 125वे जयंती वर्ष 18 नोव्हेंबर 2025 रोजी सुरू झाले आहे. या 125व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने डॉ. व्ही. शांताराम यांची कारकीर्द जिथे बहरली त्या कोल्हापूर, पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत.
- दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक
RamPrahar – The Panvel Daily Paper