कर्जत : बातमीदार : शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून माथेरानमध्ये मंगळवारी (दि. 7) तिथीनुसार शिवजयंती उत्सव अतिउत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाचे नियोजन शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी केले होते. मंगळवारी सकाळी 11 वाजता माथेरान शहरातील श्रीराम चौकात नगराध्यक्षा प्रेरणा सावंत व उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ढोल ताशाच्या गजरात शहरातून शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. त्यात शिवप्रेमी नागरिक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.
माथेरानमधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवपुतळयाला शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या हस्ते, हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्धपुतळ्यास संगीता जांभळे यांच्या हस्ते, स्वातंत्र्य स्तंभास हेमंत बिरामणे व कुलदीप जाधव यांच्या हस्ते तर छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील शिवपुतळ्यास सचिन दाभेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.