Breaking News

प्रकाशन सोहळा आणि कविसंमेलन रंगले

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघात रविवारी (दि. 17) पाच पुस्तकांचे प्रकाशन झाले. तब्बल एक वर्षाच्या कोरोना संचारबंदीनंतर नसीमा फाऊंडेशन पनवेल आणि गजल ग्रुप पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने साजर्‍या झालेल्या या सोहळ्यात कविसंमेलनही रंगले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गजलकार ए. के. शेख यांचे कविता माझी सखी हे कविता-गजलचे किस्से असलेले पुस्तक, गजलवेदना या संग्रहावरील समीक्षाग्रंथ, संदीप बोडके यांचा मीही गुलाब आहे हा कविता-गजलसंग्रह, सतिष अहिरे यांचा गजल सखीची हा गजलसंग्रह आणि डॉ. सुभाष कटकदौंड यांचा एकटा सजलो मी हा गजलसंग्रह या पाच पुस्तकांचे प्रकाशन झाले.

यानंतर उपस्थित वक्ते प्रा. डॉ. मनीषा बनसोडे यांनी कविता माझी सखी, निवृत्त मुख्याध्यापक विठ्ठल बने यांनी मीही गुलाब आहे, गजलकार रंजना करकरे यांनी गजल सखीची, कवी-गजलकार दिवाकर वैशंपायन यांनी एकटा सजलो मी, महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण सहसंचालक रोहिदास पोटे यांनी गजलवेदना एक आस्वादक समीक्षा या पुस्तकांचा संक्षिप्त परिचय करून दिला.

या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान आगरी बोलीचे अभ्यासक आणि ’दर्यादौलत’कार डॉ. अविनाश पाटील यांनी भूषवले. या वेळी ’साहित्यसंपदा’चे वैभव धनावडे यांनी जाहीर केलेले पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये रोहिदास पोटे यांना शिक्षकरत्न, तर सलोनी बोरकर यांना पुस्तकरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कवी, गजलकार रवींद्र सोनवणे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. आभार अ‍ॅड. माधुरी थळकर यांनी मानले.

यानंतर पुणे येथील गजलकार प्रमोद खराडे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. यामध्ये आबिद मुन्शी, जावेद नदीम, सुनीता जोशी, सदानंद रामधरणे, सुनीती लिमये, गणेश म्हात्रे, शिवाजी मोटे, संजीव शेट्ये, रेखा सोनावणे, रवींद्र सोनावणे, वैभव धनावडे, गुणवंत पाटील, अश्विनी बोलके, सुरेश कुलकर्णी, स्मिता हर्डीकर, कृष्णा गावडे आदी कवी, गजलकरांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गजलकार समीर शेख यांनी केले, मुशायर्‍याचे आभार सदानंद रामधरणे यांनी मानले.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply