Breaking News

पनवेल महापालिकेत समाविष्ट ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना खुषखबर!

वेतनवाढीचा महासभेत निर्णय

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना जानेवारी 2022पासून वेतनवाढ मिळणार आहे. शहरातील रस्त्यावर असलेली बेवारस व सोडून दिलेली वाहने महापालिका उचलून नेणार असल्याने आता शहरातील रस्ते मोकळा श्वास घेणार आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग ’क’ कामोठे येथे प्रभाग कार्यालय बांधण्यास आणि चारही प्रभागांतील  विविध विकासकामांना बुधवारी (दि. 6) झालेल्या विद्यमान सदस्यांच्या शेवटच्या महासभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.
पनवेल महापालिकेची महासभा बुधवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेस उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व सदस्य उपस्थित होते. या वेळी सदस्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. आजच्या महासभेला सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पत्नी अर्चना ठाकूर या प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होत्या.
पनवेल महापालिकेच्या विद्यमान सदस्यांची मुदत 8 जुलै रोजी संपत असल्याने आजची महासभा शेवटची होती. त्यामुळे आज सभेपुढे असलेले प्रस्ताव कोणतीही चर्चा न करता मंजूर करण्याचे दोन्ही बाजूंनी ठरवण्यात आले होते. फक्त सूचना मांडावयाच्या होत्या. त्यामुळे ही सभा  औपचारिकच होती.
पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतींमधून समावेशनास पात्र असलेल्या मात्र समावेशन न झालेल्या कर्मचार्‍यांच्या वेतनामध्ये किमान वेतनाच्या सापेक्ष वेतनवाढ जानेवारी 2022पासून देण्यास या सभेत मान्यता देण्यात आली.  याशिवाय विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सर्व सदस्यांचे एकत्र फोटोसेशन झाले.

‘ती’ वाहने महापालिका उचलणार
महापालिका हद्दीत रस्त्यावर अनेक ठिकाणी  बेवारस व सोडून दिलेली वाहने दिसतात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतोच, शिवाय कचरा उचलणार्‍यांनाही त्यामुळे अडचण होत असल्याने महापालिका ही वाहने उचलून नेण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक करीत आहे. 45 दिवसांत ही वाहने महापालिकेने ठरवून दिलेले पैसे भरून मालकाने न नेल्यास त्यांची भंगारात विक्री करण्याची कारवाई करणार आहे
मंजूर करण्यात आलेली कामे
1. महापालिका हद्दीतील विविध ठिकाणी आवश्यकतेनुसार दोन वर्षांसाठी वार्षिक मंजूर दराने महापालिका मालकीच्या सर्व सार्वजनिक शौचालयांची निगा, दुरुस्ती व नुतनीकरण करणे.
2. महापालिका हद्दीतील प्रभाग समिती अ, खारघर नोडमधील रस्ते, कामोठे येथील रस्ते दुरुस्ती, प्रभाग समिती ब आणि ड, नवीन पनवेल (पूर्व व पश्चिम) काळुंद्रे नोडमधील रस्ते दुरुस्ती.
3. पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती अ, ब, क, डमध्ये समाविष्ट गटारांची सन 2022-23 व सन 2023-24 या दोन वर्षांकरिता रस्त्यालगत असणार्‍या गटार, पादचारी मार्गामधील इन्स्पेक्शन चेंबर्सवर वेळोवेळी आवश्यतेनुसार झाकणे लावणे व किरकोळ दुरुस्ती.
4. महापालिका हद्दीतील मटण, चिकन, फिश, बीफ व पोर्क मांसविक्री, प्रक्रिया, दुकानांची नोंदणी व परवाना शुल्क आकारणे
5. महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. 10 मधील से.1 ई येथील साईबाबा सोसायटी ते केएलई कॉलेजपर्यंत असलेल्या नाल्याची दुरुस्ती व कुंपण फेन्सिंग करणे.
6. महापालिका हद्दीतील प्रभाग समिती क, कामोठे येथील सेक्टर 11मधील भूखंड क्र. 1 बी येथे प्रभाग कार्यालयाची उभारणी करणे.
7. पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतींमधून समावेशनास पात्र असलेल्या मात्र समावेशन न झालेल्या कर्मचार्‍यांच्या वेतनामध्ये किमान वेतनाच्या सापेक्ष वेतन वाढ करणे.
8. महापालिका क्षेत्रात यांत्रिकी पद्धतीने धुरीकरण व फवारणी सेवा पुरविणे.
9. महापालिका हद्दीत सार्वजनिक रस्त्यांची आखणी, सीमांकन अंतिम केलेल्या जागा संपादित करून हस्तांतरणीय विकास हक्काच्या माध्यमातून विकसित करणे तसेच काही नवीन सार्वजनिक रस्त्यांची आखणी मंजूर करणे.
10. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाचे साहित्यासह स्वच्छता व रखवाली करण्याकामी तीन वर्षे कालावधीकरिता ई-निविदा मागविण्यास व येणार्‍या खर्चास मान्यता देणे.
11. महापालिका क्षेत्रात सिडकोने विकसित केलेल्या खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल (पूर्व व पश्चिम) व काळुंद्रे आणि तळोजा (फेज अ) या सर्व नोडमधील मलनि:स्सारण वाहिन्यांची दोन वर्षे कालावधीकरिता आवश्यकतेप्रमाणे दुरुस्ती, सुधारणा व नूतनीकरण करणे. ब) महापालिका क्षेत्रात सिडकोने विकसित केलेल्या नवीन पनवेल (पूर्व व पश्चिम) काळुंद्रे, खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा फेज नोडमधील पारंपरिक पथदिवे बदलून नवीन एलईडी पथदिवे लावणे व पथदिप व्यवस्थेची फेज-1, फेज 2 व नावडे पाच वर्षे कालावधीकरिता दैनंदिन परिचालन, देखभाल, दुरुस्ती, सुधारण व नुतनीकरण करणे. ब) महापालिका क्षेत्रात सिडकोने विकसित केलेल्या नवीन पनवेल (पूर्व व पश्चिम) काळुंद्रे, खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा फेज 1, फेज 2 व नावडे सिग्नल व्यवस्थेची दोन वर्षे कालावधीकरिता साहित्यांचा पुरवठा करून दैनंदिन परिचालन, देखभाल, दुरुस्ती, सुधारण व नुतनीकरणे.
12. महापालिका हद्दीत बेकायदेशीरपणे सोडून दिलेली वाहने, बेवारस वाहनांवर कारवाई करण्याकामी ठेकेदार नियुक्त करणे.
13. महापालिका हद्दीतील इच्छापूर्ती गणपती मंदिर पनवेल येथील अंतिम भूखंड क्र. 388मध्ये बहुउद्देशीय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व सभागृह विकसित करण्याकरिता प्रशासकीय व आर्थिक मान्यता.
14. महापालिका हद्दीतील विविध उद्याने विकसित करणेकामी शासनाकडून निधी मागणी करणे. या सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply